Breaking News

आर्थिक सहभागीत्व वाढेल, ते गुंतवणुकीच्याच मार्गाने

भारतीय अर्थव्यवस्थेत परस्परविरोधी अशा अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. कोरोना संकटाचा संभ्रम अजून संपला नसताना या गोष्टींकडे आधी जागरूक भारतीय नागरिक म्हणून आणि नंतर एक गुंतवणूकदार म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे.

कोरोनासाथीसोबत आपल्याला दीर्घकाळ जगावे लागणार आहे, हे आता अगदी स्पष्ट झाले आहे. हे संकट किती लांबेल, याची कोणालाच कल्पना नसल्याने त्याविषयीचे दिवसागणिक वेगवेगळे अंदाज तज्ञाकडून दिले गेले. पण ते सर्व फोल ठरले. दोष कोणाचाच नाही, पण त्याचे जनजीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असल्याने कोणाला तरी जबाबदार धरून त्यावर राग व्यक्त करणे, ही समाजाची मानसिक गरज आहे. ती सध्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर भागविली जाते आहे. हा मुद्दा बाजूला ठेवला तर आता भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीची अतिशय गांभीर्याने चर्चा करावी लागणार आहे. कारण आता आपल्यातील काही समुहाचे आर्थिक प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करू लागले आहेत. जगाच्या तुलनेत गेली अनेक दशके अतिशय स्थर्य उपभोगणार्‍या भारतीय समाजाला कोरोनाने मोठाच धक्का दिला आहे. मनुष्यहानी आणि मानसिक हानी भरून काढणे शक्य नसते, पण जीवनक्रम सुरू ठेवण्याचे काम अर्थचक्र करू शकते. ते चक्र लवकरात लवकर सुरू व्हावे आणि त्या चक्रात आपल्या वाट्याला बरे दिवस यावेत, असे प्रत्येकाला वाटणे अगदी साहजिक आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थव्यवस्थेविषयीची काही सूचकविधाने गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध झाली आहेत. हे संकट ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे म्हणजे देवाची करणी आहे, असे काही त्यांनी म्हटले आहे. आजच्या अत्याधुनिक जगाला हे संकट कोठून आले आणि कसे जाणार, याचा नऊ महिने थांगपत्ता लागत नसताना ही देवाची करणी (नियती) आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कोरोना संकटामुळे जे आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांना तोंड देताना सर्वव्यापी दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असे त्यांचे दुसरे एक विधान आहे. ही सर्वव्यापी दृष्टी म्हणजे त्याकडे पारंपरिक अर्थशास्त्राच्या पद्धतीने पाहता येणार नाही, असे त्यांना म्हणायचे आहे. अर्थव्यवस्था किती वेगाने घौडदौड करते आहे, यापेक्षा अधिकाधिक नागरिकांना काहीही करून जगण्याची संधी देणे, ही आजची गरज आहे. ती भागविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सहभागीत्व आणि संपत्ती वितरणाचे काही धाडसी निर्णय घेण्याची वेळ सरकारवर येवू शकते, याचे हे सुतोवाच असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये तेच अपेक्षित आहे.

अर्थव्यवस्थेची केवळ घौडदौड नको आहे!

गेले नऊ महिने जे घडते आहे, तसे पूर्वी कधीही घडले नव्हते आणि त्याला सामोरे जाताना पूर्वी घडविले नव्हते, असेच काहीतरी करावे लागणार आहे. शेतकर्‍यांना दिली जात असलेली थेट आर्थिक मदत, स्वस्त धान्य दुकानातून 81 कोटी नागरिकांना दिले जात असलेले धान्य, महिलांना जन धन खात्याच्या माध्यमातून केली जात असलेली मदत, गरजू कुटुंबाना मोफत देण्यात आलेले सिलेंडर, हे असे काही मार्ग आहेत. युरोपामध्ये निदर्शने होत असताना भारतीय समाज शांत वाटतो आहे, त्याचे कारण त्याचे व्यक्तीमत्व जसे आहे, तसेच या उपाययोजना आहेत. अशा मार्गाने पारंपारिक अर्थाने थेट विकासाला हातभार लावला जात नसला तरी ती आजची सर्वात महत्वाची गरज आहे. उलट पुढील काळात ही मदत आणखी वाढविण्याची वेळ येणार आहे. याची जाणीव अर्थमंत्र्यांना असलेच. त्यामुळेच आणखी काही पॅकेज देण्याची वेळ आली तर सरकार त्यासाठी तयार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. अर्थव्यवस्थेची पारंपरिक अर्थाने घौडदौड झाली नाही तरी चालेल, पण माणसे जगविली पाहिजेत, असाच विचार केवळ भारतच नव्हे तर जगालाही करावा लागणार आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

पण शेअर बाजार का वाढतो आहे?

अशी ही चिंता एकीकडे व्यक्त केली जात असताना भारताच्या शेअर बाजारात काही वेगळेच चालले आहे. ते म्हणजेच नजीकच्या भविष्यकाळात अर्थव्यवस्था कशी असेल, ती कधी वेग घेईल, याविषयीचे आडाखे बांधण्याची संधी सध्याची स्थिती देत नसतानाही शेअर बाजार मात्र उधळला आहे. कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात आले तेव्हा तो कोसळला होता आणि तेथपासून म्हणजे तीन चार महिन्यांत त्याने 50 टक्के उसळी मारली आहे. काही व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु झाल्यामुळे वाढत गेलेल्या आशा त्याला कारणीभूत असाव्यात. किंवा भारतीय अर्थचक्र लवकर वेग घेईल, असे गुंतवणूकदारांना वाटत असावे. किंवा भारताच्या ग्रोथ स्टोरीवर देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांना विश्वास असावा. किंवा काही नागरिकांकडे गुंतवणूक करण्यासाठीचा पैसा पडून असावा. किंवा या काळात घरात बसल्याबसल्या पैसा मिळत असेल तर त्यात का भाग घेऊ नये, असे वाटल्याने गुंतवणूकदारांची वाढलेली संख्या, हेही त्याचे कारण असू शकेल. अर्थात, त्याचे एकच विशिष्ट असे काही कारण नाही. यासर्व कारणांचा थोडा थोडा वाटा असल्याने भारतीय शेअर बाजार, अशा आव्हानात्मक आर्थिक स्थितीतही वाढतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे अधिकाधिक नागरिकांचे लक्ष यानिमित्ताने गेले, हे चांगलेच झाले. या गुंतवणुकीचा फायदा आपल्या देशातील मोजके गुंतवणूकदार आतापर्यंत घेत होते. पण आता लाखो नव्या गुंतवणूकदारांनाही त्यात भाग घेता येईल.

परतावा उत्तम, पण सावधान!

विकासाच्या मागे लागलेल्या जगात महागाईत वाढ होणे, हे अपरिहार्य मानले जाते. त्यामुळे त्या महागाईवरमात करणारी गुंतवणूक असली पाहिजे. बँकेतील एफडी किंवा पारंपरिक जीवनविमा अशा महागाईवर मात करू शकत नाही. महागाईवर मात करणारी गुंतवणूक म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. अर्थात, या गुंतवणुकीत कायमच मोठी जोखीम राहिली आहे. कारण शेअर बाजारात सतत चढउतार चालू असतात आणि त्याचा फायदा बहुतांश ट्रेडिंग करणारी मंडळीच घेत असते. पण जे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे चांगले शेअर घेऊन शांत बसणे, असा मार्ग अवलंबतात, त्यांनाही शेअर बाजाराने चांगला परतावा दिला आहे. सोबतच्या चौकटीवरून त्याची कल्पना यावी. हे आकडे तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. त्याने हुरळून जावून शेअर बाजारात आपणही गुंतवणूक करावी, असे अनेकांना वाटून जावू शकते. पण अभ्यास न करता तसे केले तर आहे ते मुद्दल घालवून बसण्याची वेळ येवू शकते, असा इशाराही देऊन ठेवला पाहिजे.

अशा संकटसमयी गुंतवणूक कामी येई

ज्यांना शेअर बाजारातील परताव्याचा फायदा घ्यायचा आहे, त्यांनी मोजके म्युच्युअल फंड निवडून त्यात दर महिन्याला विशिष्ट रक्कम (एसआयपी) गुंतविण्यास सुरुवात केली पाहिजे. शेअर बाजारातील चढउतारांची जेव्हा सवय होईल, तेव्हाच डीमॅट खाते उघडून थेट शेअर घेण्यास हरकत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही शिफारस नव्हे. मात्र गुंतवणुकीच्या इतर सर्व मार्गाने असा परतावा मिळत नाही, म्हणून या गुंतवणुकीकडे आपले लक्ष असले पाहिजे, हे लक्षात आणून देण्यासाठी हे प्रयोजन. अशा चढउतारांवर मात करून कोरोना संकटातही जे गुंतवणूकदार शेअर बाजारात टिकून होते, त्यांनी गेल्या तीन महिन्यांत चांगला पैसा मिळविला आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातही ते जवळ चांगले पैसा बाळगून आहेत. अशा आर्थिक संकटात गुंतवणूक कामाला येते, म्हणून हातात पडत असलेल्या उत्पन्नातून किमान 10 टक्के तरी गुंतवणूक केली पाहिजे. असे केल्यानेच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि अशा संकटकालीन आर्थिक चिंता कमी करता येतात.

अबब, केवढा हा परतावा!

गेल्या 20 वर्षांत अशा 54 कंपन्या आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना किमान 100 पट परतावा दिला आहे. एखाद्याने 2000 साली सिम्फनी कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर घेतले असते, तर त्यांची किंमत आज 10 कोटी झाली असती. अर्थात, या दोन दशकातील चढउतारात असे शेअर सांभाळणे, हे सोपे काम नव्हे! त्याशिवाय बाळकृष्ण इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, आयशर मोटार, विनाती ओर्गेनिक्स, अतुल लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील, रत्नामनी मेटल्स, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान झिंक, कोरोमंडल इंटरनॅशनल, वोल्टाज, अवंती फिडस, अशा अनेक कंपन्यांनी असाच उत्तम परतावा दिला आहे. ज्यांनी या कंपन्यांची व्यवसाय वृद्धी हेरता आली, त्यांनी प्रचंड पैसा कमावला आहे.नजीकच्या भविष्यात आयटी, फार्मा, आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणार्‍या कंपन्या चांगला परतावा देतील. अर्थव्यवस्था संघटीत होत असताना मोठ्या कंपन्यांची उलाढाल वाढणार आहे, त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नागरिक वळत आहेत. आपण त्यात भाग घ्यायचा की नाही, हा अर्थातच, ज्याच्या त्याच्या स्वातंत्र्याचा आणि जोखीम पेलण्याचा विषय आहे.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

भाजपच्या दणक्याने रूबी मिल्स कंपनी व्यवस्थापन नरमले

15 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र खोपोली, चौक : प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील …

Leave a Reply