Breaking News

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध भाजप आक्रमक

धाटाव ः प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ वाढीव बिले देण्यात आली. याबाबतची दाद मागायला सर्वसामान्य जनता महावितरण कार्यालयात पोहचत नाही. काही नागरिक पोहचले, तर अधिकारी बिलासंदर्भात काहीही हिशेब दाखवतात. जे बिल आले ते आधी भरा. मीटरसंदर्भात ज्यांना तक्रारी असतील त्यांचे आम्ही नंतर बघू, असे अधिकारी सांगतात. त्यामुळे रोहा तालुक्यातील सामान्य नागरिक संतापल्याने नुकतीच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध भाजपने आक्रमक भूमिका घेत काही मिनिटांतच संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये ठोस आश्वासनांसह अनेक ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी घेण्यात आल्या.

ज्या नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वाढीव बिले देण्यात आली ती बिले दुरुस्ती केल्याशिवाय भरू नयेत. ज्यांना सहा महिन्यांचे बिल आले असेल त्यांना टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी सवलत देण्यात येईल. ज्यांचे मीटर प्रमाणापेक्षा जास्त रीडिंग दाखवते व दुरुस्तीसाठी जे 260 रुपये आकारले जायचे, ते पैसे ग्राहकांना परत दिले जातील. बिलाबाबतच्या समस्या आणि लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लवकरच कॅम्प लावण्यात येतील, असे आश्वासन महवितरणच्या अधिकार्‍यांनी अमित घाग यांना दिले. या वेळी घाग यांनी विद्युत महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply