हैदराबाद : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 12व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला. विजयाच्या उंबराठ्यावर असताना सनरायझर्स हैदराबादला तीन धक्के बसले, मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सवर मात करण्यात यश मिळवले.
199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या वॉर्नर-जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या गड्यासाठी अवघ्या 58 चेंडूंत 110 धावा रचल्या. वॉर्नरने 37 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 69 धावा केल्या. बेअरस्टो (45) बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव घसरला. परंतु रशीद खानने षटकार लगावत हैदराबादचा पहिलावहिला विजय साकारला. सनरायझर्स हैदराबादने 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावा केल्या. त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सॅमसनने साकारलेल्या तुफानी फलंदाजीच्या बळावर राजस्थानने 20 षटकांत 2 बाद 198 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर जोस बटलर (5) लवकर माघारी परतल्यावर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सॅमसनने कर्णधार अजिंक्य रहाणेसह दुसर्या गड्यासाठी 75 चेंडूंत 119 धावांची भागीदारी रचली. शाहबाज नदीमने रहाणेला (70) बाद करीत ही जोडी फोडली. सॅमसनने 20व्या षटकाच्या तिसर्या चेंडूवर चौकार लगावत यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या; तर कारकीर्दीतील दुसर्या शतकाला गवसणी घातली. त्याने 55 चेंडूंत 10 चौकार व चार षटकारांसह नाबाद 102 धावा केल्या.