रोहे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महारांजानी कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. त्यांनी राष्ट्राला सर्मिपत होणारी माणसे निर्माण केली. जगातील एकमेव चारित्र संपन्न व कर्तृत्वान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.तुकाराम मस्के यांनी येथे केले.
रोहा तालुका सकल मराठा समाजातर्फे येथील राम मारुती चौकात मंगळवारी शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार घालुन या सोहळ्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रा. तुकाराम मस्के बोलत होते. आजच्या तरुणांनी तलवार बाळगली नाही तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकरले पाहिजेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविकात सुहास येरूणकर यांनी सकल मराठा समाजाच्या वतिने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.सकल मराठा समाजाचे रोहा तालुका अध्यक्ष प्रदिप देशमुख, ज्येष्ठ नेते व्हि. टि. देशमुख, नगर परिषदेच्या सभापती स्नेहा अंबरे, नगरसेविका समिक्षा बामणे, नगरसेवक अजित मोरे, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे, ह.भ.प.शेळके महाराज, रत्नप्रभा काफरे, महेश सरदार, मनोहर सुर्वे, प्रशांत देशमुख, निलेश शिर्के, सचिन शेडगे, अमोल देशमुख, विनोद सावंत, परशुराम चव्हाण,संदिप सावंत, स्वरांजली शिर्के, विद्या घोडिंदे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- मुरुड नगर परिषदेतर्फे शिवजयंती साजरी
मुरुड : प्रतिनिधी
शिवजयंती निमित्त मुरुड नगर परिषदे तर्फे मंगळवारी (दि.19) संध्याकाळी लक्ष्मीखार येथील बापदेव मंदिरापासून लेझीम पथक व ढोलताशांच्या गजरात शिवप्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर केली. नगर परिषद कार्यालयााच्या प्रांगणात या मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महारांजाचा आदर्श आजच्या पिढीने आचरणात आणल्यास महाराष्ट्र हे एक चांगले व बलवान राज्य झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी यावेेळी व्यक्त केला. उपनगराध्यक्षा नौशीन दरोगे, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकु, पर्यटन व नियोजन सभापती पांडुरंग आरेकर, गट नेत्या मुग्धा जोशी, मुख्याधिकारी दयानंद गोरे, पर्यटन महोत्सव सभापती आदेश दांडेकर, उपाध्यक्ष कुणाल सतविडकर, अविनाश दांडेकर, पोलीस निरीक्षक किशोर साळे, सुरेश उपाध्ये, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त मुरुड तालुक्यातील प्राथमिक शाळा व महाविद्यलयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या कल्पश्री अरुण थोराड (पहिली ते सातवी गट) आणि श्रुती सुशील ठाकूर (आठवी ते पंधरावी गट) यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरविण्यात आले. यावेळी नगर परिषदेतर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या यशस्वी स्पर्धकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी रेवदंडा येथील श्रीराम स्पोर्ट असोशिएशनचे प्रशिक्षक गिरीश नाईक व मनोज पारकर यांच्या विद्यार्थ्यांनी मलखांब, दोर मलखांबाची प्रात्यक्षिके सादर केली.
- पालीतील शिवस्मारकात शिवज्योतींचे स्वागत
पाली : प्रतिनिधी
शिवजयंत्तीनिमित्त तरुणांनी किल्ले रायगड आणि शिवनेरी येथून पायी आणलेल्या शिवज्योतींचे मंगळवारी पाली (ता. सुधागड) येथील शिवस्मारकात स्वागत करण्यात आले. पालीतील संघर्ष ग्रुपचे सदस्य अमित निंबाळकर, सतिष शिंदे, शिरिष मांढरे, प्रविण थळे यांच्यासह सदस्यांनी शिवस्मारक परिसर स्वच्छ करुन फुलांनी सजविला होता. मात्र पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहिद झाल्याने यावर्षी वाद्यवृदांच्या गजरातील भव्य मिरवणूका व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. सुधागड तालुक्यात पाली, परळी, जांभुळपाड्यासह अनेक गावात तसेच शाळा, कॉलेज, शासकीय निमशासकीय कार्यालयात विविध प्रबोधनात्मक व सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्यात आली. परळीत सम्यक क्रांती विचारमंचाच्या वतीने दोन दिवशीय शिवजयंत्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या वतीने पालीतील संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रणय सावंत, शरद गोळे, प्रा. संतोष भोईर, निवृत्त सैनिक प्रसाद लखिमळे, राहुल गायकवाड, धम्मशिल सावंत, बशीर परबळकर, गणेश कदम आदिंनी विचार मांडले. यावेळी शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.