मुरूड : प्रतिनिधी
रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी घातलेल्या बंदीचा कालावधी संपल्याने रविवारी (दि. 3) जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, दिवसाला 400 पर्यटकांनाच किल्ल्यात नेता येईल अशी जिल्हाधिकार्यांच्या आदेशातील अट पुरातत्व खात्याकडून दाखविण्यात आली, मात्र या आदेशाची मुदत संपली असल्याचे सांगत सर्व बोट मालक व चालकांनी एकत्र येत जलवाहतूक बंद ठेवून या निर्णयाचा निषेध केला. परिणामी शेकडो पर्यटकांना किल्ला न पाहातच परतावे लागले. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा 25 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. या बंदीचा कालावधी संपल्याने रविवारी जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पुन्हा एकदा व्यवसायासाठी सज्ज झाले होते. राज्यभरातून पर्यटकही मोठ्या संख्येने किल्ला पाहण्यासाठी आले होते, मात्र दिवसाला 400 पर्यटकांना किल्ल्यात जाण्यास परवानगी आहे, असे पुरातत्व खात्याने सांगितल्याने जलवाहतूक करणार्या सर्व सहकारी सोसायट्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने आण करण्यासाठी पाच सहकारी सोसायट्या असून, नव्या नियमानुसार प्रत्येक सोसायटीला फक्त 80 पर्यटक नेता येणार आहेत. त्यामुळे सर्व बोट मालक व चालक एकत्र येत त्यांनी जल वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य ठिकाणी सर्रास गर्दी होत असताना केवळ जंजिरा किल्ल्यावर निर्बंध का, असा सवाल त्यांनी केला आहे. नियमाप्रमाणे रविवारपासून जंजिरा किल्ला सुरू होणे आवश्यक होते, परंतु जिल्हाधिकार्यांच्या मुदत संपलेल्या पत्राचा आधार घेऊन खेळ करीत पुरातत्व खात्याने नियमावर बोट ठेवले आहे. या विरोधात बोट चालक-मालकांनी आंदोलन पुकारल्याने ऐतिहासिक जंजिरा किल्ला आता आणखी किती दिवस बंद राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही एवढ्या लांबून मोठ्या अपेक्षेने ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलो होतो, मात्र जलवाहतूक बंद असल्याने आम्हाला किल्ला पहाता आला नाही याचे दुःख होत आहे. -अभिजित सूर्यवंशी, पर्यटक, कोल्हापूर
जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणार्या जलवाहतूक सोसायट्यांचा 400 पर्यटक संख्येवर आक्षेप असल्याने किल्ला बंद ठेवण्यात आला आहे. -एस. जी. गोगरे, संरक्षक, जंजिरा किल्ला, पुरातत्व विभाग