Breaking News

एकजिनसी महायुती आणि अस्वस्थ काँग्रेस-राष्ट्रवादी!

भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी हे अत्यंत परखड, स्पष्टवक्ते म्हणून ओळखण्यात येतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतात व महाराष्ट्रात राजकीय वातावरण एकदम पालटले. केंद्रातली 10 वर्षांची आणि महाराष्ट्रातली 15 वर्षांची काँग्रेसप्रणित आघाडीची राजवट जनतेने उखडून फेकून देत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या युती-महायुती-राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवर विराजमान केले.

केंद्रात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तसेच मित्रपक्षांची राजवट आली, पण देशातल्या जनतेने व राज्यातल्या मतदारांनी काँग्रेस-राषट्रवादीला विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता दिली नसल्याने सत्तेत असूनही जनतेसोबत असल्याचे सांगत शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका वठवली. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 25 वर्षांपासून चालत आलेली भाजप-शिवसेना युती दुर्दैवाने तुटली. कोणामुळे काय काय झाले हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे, पण दिल्लीत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्यामुळे भाजप-शिवसेना एकत्र राज्य करू लागले. रुसवेफुगवे तर चालायचेच. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही 15 वर्षे भांड्याला भांडेच नव्हे तर भांडणे झालेलीही आपण पाहिलीच आहेत. या परिस्थितीत नितीन गडकरी यांनी प्रत्येक वेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला (शिवसेना-भाजप युती होणार काय?) हे पाहा, आमचं कसं आहे, माहिती आहे का? तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना! असं आहे. नवरा बायकोमध्ये भांडणे होत नाहीत का? पण म्हणून संसार चालतोय ना? तसंच अगदी आमचं म्हणजे शिवसेना-भाजप युतीचं आहे. नितीन गडकरी यांचे हे उद्गार आणि हिंदुत्वाच्या रेशमी धाग्यात बांधलेली युती ही चिरकाल टिकेल अशी त्यांनी व्यक्त केलेली भूमिका 18 फेब्रुवारी 2019च्या दिवशी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, डॉ. मनोहर जोशी आदी नेत्यांच्या उपस्थितीत एकदम पक्की झाली. इतकेच काय लोकसभा 2019च्या निवडणुकीसाठी युती-महायुती एकदम एकजिनसी झाली. 24 मार्च 2019 रोजी करवीर निवासिनी अंबाबाईच्या साथीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आई अंबे, युती-महायुतीला भरघोस यश दे!’ असं साकडं घातलं आणि प्रचाराचा श्रीफळ अतिविराट जाहीर सभेत वाढवला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने समन्वय समित्या बनवल्या, स्टार प्रचारक मैदानात उतरविले आणि भाजपने एक हजार जाहीर सभांचा धूमधडाका उडवून देण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुमारे 100 सभा एकटेच घेणार आहेत आणि उद्याच्या एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा झंझावात सुरू होतोय. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून लोकसभेसाठी आपला निवडणूक अर्ज भरला तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी स्वत: उपस्थित राहून ‘हम साथ साथ है!’ हेच दाखवून दिले. गांधीनगरला मैलोन्मैल मोठा, अतिविराट रोड शो करताना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी गुजरात आणि महाराष्ट्र हे एकजिनसी आहेत तद्वत शिवसेना-भाजप युतीही एकजिनसी झाल्याचे ‘करून दाखवले!’

1952-1957च्या लोकसभा निवडणुकांपासूनच्या चर्चा मी आणि विजय वैद्य करताना ‘बॉम्बे प्रोविन्स’, ‘मुंबई इलाखा’ हा महाराष्ट्र आणि गुजरात एकत्रच होता हे दाखवणारे हे अत्यंत सुखद असे चित्र म्हणावे लागेल. शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी नेत्यांनी वर्षा आणि मातोश्रीसमवेत अत्यंत चांगला समन्वय ठेवला. दोन पक्षांची युती असताना समन्वय, सहकार्य, सामंजस्य, सौहार्द या बाबी असल्या तर एकजिनसीपणा निश्चित होऊ शकतो आणि नेमके हेच भाजप-शिवसेना नेत्यांनी ‘करून दाखवले!’ निवडणुका म्हटल्या की त्या सत्तेसाठी, बहुमतासाठी असणारच आणि मग त्यासाठी सर्वच पक्षांकडून वेगवेगळ्या व्यूहरचना आखण्यात येतात, पण हे करताना विविध पक्ष, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणार हे ओघानेच आले. अर्थात आता विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपण काय काय केले हे पद्धतशीरपणे विसरले की त्यांना विस्मृतीचा रोग जडला?

कारण भारतीय जनता पार्टीवर व भाजप-शिवसेना युतीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्ता उपभोगताना काय काय केल्यामुळे काय काय, कोणाला शिक्षा भोगाव्या लागल्या? गेल्या आठवड्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न योजना (मिनिमम इन्कम स्कीम) जाहीर करून गरिबी हटावचा आजींचा नारा पुन्हा एकदा म्हणून दाखवला.

इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची घोषणा केली. काँग्रेस 55 वर्षे सत्तेवर राहिली या काळात काँग्रेसचे नेते मात्र श्रीमंत झाले, पण गरीब गरीबच राहिले. झोपडपट्ट्यांची संख्या वाढतच गेली. कारण परराज्यातून माणूस मुंबई महाराष्ट्रात आणायचा, त्याला शिधापत्रिका (रेशनकार्ड) मिळवून देण्याची ‘कृपा’ करायची, मतदार यादीत नावं वाढवायची आणि आपल्या तुंबड्यांबरोबर मतपेट्या भरायच्या हा परिपाठ लोकांना माहीत नाही का? वांद्रे स्थानकाजवळ चार-चार मजली झोपड्या कुणामुळे झाल्या? त्यांना आगी कशा लागतात? झोपडपट्टी वसवायची आणि त्यांना महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची नावे द्यायची आणि आपापली ‘इप्सिते’ विनासायास पार पाडून घ्यायची. एकदा विलासराव देशमुख यांनी मुंबईचं शांघाय करण्यासाठी जागतिक बँकेची अट होती म्हणून मुंबईच्या झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न केला. काही झोपड्या उद्ध्वस्तही केल्या. तेव्हा काँग्रेसचेच नेते त्या बुलडोझरसमोर आडवे होत सोनिया गांधींकडे विलासरावांना रोखा, अशी आर्जवे करीत होते. यांचे खायचे निराळे आणि दाखवायचे दात निराळे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीतून तयार झालेले भाजपचे नेते एका रात्रीत शरद पवार महान नेते म्हणून भाजपवर गरळ ओकले झाले, पण 15 वर्षे सत्तेत असताना गरीब आणि बांधावरचा शेतकरी न दिसणारे, न पाहणारे हे नेते आता बांधाबांधावर फिरायला लागलेत हाच जनतेचा, लोकशाहीचा करिष्मा.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचं आकड्यांचं प्रेम पण पहा किती अफलातून आहे. राहुल गांधी यांनी मिनिमम इन्कम स्कीमखाली प्रत्येकी सहा हजार रुपये महिना पगार कमावणार्‍या गरिबांच्या बँक खात्यात 72 हजार रुपये टाकण्याची घोषणा केली. 55 वर्षे सत्तेत असताना यांना कुणी रोखले होते? त्यावेळी 72 हजार नाही 50 हजार, 25 हजार पण भरले नाहीत. स्वत:च्या तुंबड्याच नेत्यांनी भरल्या. 72 हजार? केवढे प्रेम 72 हजारच्या आकड्यावर! शरद पवार यांनी केंद्रात कृषिमंत्री असताना 70-72 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. टुजी-थ्रीजी कॉमनवेल्थ घोटाळ्याचा आरोप किती कोटींचा एक कोटी 72 हजार कोटींचा? सिंचन घोटाळ्याचा किती कोटींचा? 72 हजार कोटींचा? मंत्रिमंडळातून बाहेर राहिलेले दिवस किती? 72! व्वा! फारच छान. आता देशातले अर्थतज्ज्ञ म्हणाताहेत की 72 हजार रुपये मिनिमम इन्कम स्कीममुळे अर्थव्यवस्था डबघाईला येईल. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप मालिकेचा शुभारंभ करताना या 72 हजारांच्या योजनेचे वास्तव नजरेस आणून दिले. 72 हजार रुपये प्रत्येक गरिबाच्या खात्यात टाकण्यासाठी देशातल्या सर्व विकास योजना बंद कराव्या लागतील. अनुदान-सबसिडी बंद कराव्या लागतील.

इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा केल्यानंतर आणीबाणी आली, लादली. रणजितसिंह मोहिते-पाटील, डॉ. सुजय विखे -पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदींनी भाजपात प्रवेश केल्यावर आणि देशातल्या राजकीय वातावरणात आमूलाग्र बदल होत विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यामुळे ‘मुलं पळवणारी टोळी’ असे बालिश आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीवाले करू लागले. त्याला जबरदस्त मुँहतोड जवाब देताना भाजप नेते मधू चव्हाण यांनी काँग्रेसवाल्यांसमोर यशवंतराव चव्हाण यांचाच आरसा दाखवला. शंकरराव मोहिते-पाटील, यशवंतराव मोहिते- पाटील यांना काँग्रेसमध्ये आणण्याची परंपरा यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केल्याचे सांगून मधू चव्हाण यांनी काँग्रेसवाल्यांची बोलती बंद केली, पण बेताल बडबड करणार्‍या काँग्रेसवाल्यांना कोण बोलणार? मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेेरे ओढल्याच्या बातम्या येताच निकाल वाचल्याशिवायच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की, महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले. खरे आहे. नैतिकतेची चाड नसलेले समोरच्यांवर आरोप करतात हे इतिहासात पहिल्यांदाच घडले. ज्यांना सोनिया गांधींनी मुख्यमंत्रिपदावरून उतरवून पृथ्वी मिसाईल महाराष्ट्रात पाठवले ते दुसर्‍यांना कोणता ‘आदर्श’ दाखवणार? भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याचे आरोप ज्यांच्यावर होतात ते भाजप नेत्यांवर आगपाखड केल्याशिवाय काय करणार? शेतकरी नेते म्हणवणार्‍यांची मालमत्ता पाच वर्षांत लाखांवरून कोट्यवधींच्या घरात जाते, त्यांनी इतरांना नैतिकतेचे धडे शिकवावेत? अरे, जनाची नाही निदान मनाची तरी ठेवणार की नाही? पण सगळे सोडून वावरणार्‍यांकडून अपेक्षा तरी काय ठेवणार. बाळासाहेब ठाकरे ज्या बॅ. अब्दुल रहेमान अंतुले यांना धाडसी मुख्यमंत्री म्हणून गौरवित होते, त्यांचे सुपुत्र नावेद अंतुले शिवसेनेत आल्याने युतीचे पारडे रायगड जिल्ह्यात जड झाले. नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी डॉ. सुजय विखे-पाटील यांना समर्थन दिले. त्यामुळे तिथेही युतीचेच पारडे जड झाले.

ख्यातनाम कवी दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी दलित पँथरचा पाठिंबा शिवसेनेला जाहीर केला. त्याचा फायदा मुंबई, महाराष्ट्रात युती-महायुतीलाच मिळणार. या सर्व तळागाळातल्या लोकांसाठी, पीडित, दीनदलितांसाठी, श्रमिकांसाठी, असंघटितांसाठी, महिलांसाठी काम करणार्‍यांना, रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, अविनाश महातेकर, मल्लिका अमर शेख, विजय कोवळे यांसारख्या नेत्यांना फुलासारखे जपणे ही महायुती-युतीच्या नेत्यांची जबाबदारी आहे. ते ती निश्चित पार पाडतील ही खात्री आहेच. ‘सबका साथ सबका विकास’ हे सूत्र घेऊन ‘गाली यह गहना है’ (शिव्या या अलंकार आहेत) हे म्हणणार्‍या नरेंद्र मोदींना साथ द्या, अच्छे दिन निश्चित येणार!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply