Breaking News

रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा उपक्रम -निधी चौधरी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड बाइक्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून समाजात वाहतूक नियम व रस्ते सुरक्षाविषयी सकारात्मक संदेश जाईल व जनजागृतीही होईल. त्याचबरोबर रायगडमध्ये पर्यटन वृद्धीही जोमाने होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवारी (दि. 20) येथे व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींच्या पुढाकारातून अलिबाग येथे दरवर्षी रायगड बाइक्स फेस्टिवल हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. शनिवारी या उपक्रमाला जिल्हाधिकारी निधी चौधरी व पोलीस अधीक्षक अशोक दूधे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बाईक रायडर्सच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याची संस्कृती, पर्यटन याविषयीची माहिती राज्य तसेच देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

रायगडमधील समुद्रकिनारी पर्यटन अधिक विकसित व्हावे, येथील लोकसंस्कृती सर्वदूरपर्यंत पोहोचावी तसेच  वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा या विषयांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने रायगड बाइक्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनीही या रायगड बाइक्स फेस्टीवलला शुभेच्छा दिल्या.

या बाइक्स फेस्टिवलमध्ये जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध भागातील बाइक रायडर्स सहभागी झाले आहेत. अवघ्या साडेचार वर्षांचा चिमुकला गंधार प्रसाद चौलकर हादेखील या उपक्रमात स्वतः हेल्मेट घालून सहभागी झाला होता.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच प्रसाद चौलकर, शार्दुल भोईर, धनंजय साक्रूडकर, महेंद्र पाटील, केतन भगत, कौस्तुभ पाटील, प्रवीण बोने, राजेश शिंदे यांची या वेळी उपस्थिती होती. हा कार्यक्रमासाठी सचिन काळे, एसएसके, इनविक्टस्, महा ऑटो व्हिल्स, वेगा इलेक्ट्राँनिक्स, राजू कांतीलाल जैन यांचे प्रायोजकत्व लाभले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply