कर्जत : बातमीदार
[google-translator]मुंबई विलेपार्ले येथील सहारा स्टार इंटरनॅशनलमध्ये मिस अॅण्ड मिसेस इंडिया पॅसिफिक 2019 ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. शंभरहुन अधिक मिस आणि मिसेस या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात विविध देशांतील महिलांचाही सहभाग होता, त्यामधून 10 जणांची निवड करण्यात आली आणि यामध्ये कर्जतच्या करिश्मा सैनी या विजेत्या ठरल्या. कर्जतच्या करिश्माने आपला करिष्मा दाखविला, असे कौतुक मान्यवरांनी केले. करिश्मा पुरुषोत्तम सैनी या मूळच्या कर्जतच्या, लहानपणापासून फॅशन शोमध्ये काम करण्याची आवड आणि इच्छा होती. केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनत घेऊन करिश्मा सैनींनी मॉडेलिंग क्षेत्रात प्रगती केली. सैनी यांचे बीएपर्यंतचे शिक्षण कर्जत कोकण ज्ञानपीठ येथे झाले आणि पुढील शिक्षण मुंबईतील बिर्ला महाविद्यालयात झाले. करिष्मा यांना पहिला फ्लॅटफॉर्म 2012 मध्ये खोपोली युथ फेस्टिवलमध्ये मिळाला. तेथे त्यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला. यामुळे आत्मविश्वास वाढला. ठाणे येथील फॅशन आयकॉन 2018 मध्येही त्यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यांनतर मिस इंडिया पॅसिफिक 2019च्या ग्रँड फिनाले विजेता ठरल्याने करिष्मा सैनी यांना मान्यवरांच्या हस्ते मिस इंडिया म्हणून अवॉर्ड देण्यात आले.