Breaking News

खडसेंच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

जळगाव ः प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी (दि. 25) पहिल्यांदाच जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. या वेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले, मात्र या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम  चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ते आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी कार्यालयात आले आहेत. अगदी आयत्या वेळी आणि सकाळी लवकरच हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याने बाहेर गावी असलेले अनेक जण या ठिकाणी पोहचू शकले नाहीत. शिवाय काही दिवसांत नाथाभाऊ खडसे यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्या वेळी सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. कमी वेळात आणि अगदी सकाळच्या वेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात काही नेते त्यांच्या खासगी कामानिमित्ताने जिल्ह्याबाहेर असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाहीत, अशी सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply