मोहापाडा ः वार्ताहर
दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एन. आयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदीर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, प्रीआ स्कूल आदी असल्याने चांभार्ली उताराचा रस्ता ओलांडत असताना जीव मुठीत घेऊन नागरिक रस्ता ओलांडत आहेत. या अगोदर रस्त्यावरुन भरधाव जाणार्या वाहनांना लगाम बसावी म्हणून उताराजवलील आगरी कट्ट्यासमोर, सेबी वळणाजवळ गतिरोधक बसविण्यात आले होते.परंतु एनआयएसएम सेबी प्रकल्पाच्या उदघाटनाला पंतप्रधाध नरेंद्र मोदी येणार असल्याने या रस्त्यावरील गतिरोधक काढण्यात आले. गतिरोधक काढून तीन वर्ष होऊनही या उताराच्या रस्त्याला गतिरोधकच नसल्याने अपघातांची मालिका सुरु आहे.कालणवाडी, शिवनगर, तलेगाव, पानशील आदी गावातील विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडून शिक्षणासाठी जावे लागते. अशावेळी अनर्थ घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत. यासाठी चांभार्ली मोहोपाडा रस्त्याला गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.
चांभार्ली रस्त्याच्या उतारापासून सेबी वलणापर्यंत वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकच नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात.त्यामुले अपघातांना आमंत्रण मिलत असून अपघातांची मालिका सुरुच आहे. तरी संभाव्य अपघात टालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.