नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज
नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता पथकाचा वॉच राहणार आहे.
बेफिकीर नागरिकांमुळे इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करून त्यांना योग्य ती समज दिली जात आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत 48 लाखांहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. ही दिलासाजनक बाब असली तरी कोरोना हा संसर्गातून पसरणारा रोग असल्याने जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
येत्या सण उत्सवांमध्ये खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता याविषयी कमालीचे दक्ष असणार्या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत दक्षता पथकांव्यतिरिक्त आठही विभागांसाठी स्वतंत्र विशेष दक्षता पथके (स्पेशल व्हिजीलन्स स्क्वाड) निर्माण केली आहेत. विभाग कार्यालयांची पथके आपले काम करीतच आहेत, त्यांच्या जोडीला ही विशेष दक्षता पथके आरोग्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तींविरोधातील कारवाईला अधिक बळ देणार आहेत.
या विशेष दक्षात पथकांमध्ये महानगरपालिकेच्या दोन कर्मचा-यांसह दोन पोलीसही असणार आहेत. विशेष दक्षता पथकांमध्ये पोलिसांचा समावेश असल्याने ही कारवाई अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा या कारवाईमागील उद्देश दंडात्मक वसूली हा नसून नागरिकांनी आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन करावे व आपल्या स्वत:ची आणि आपल्या संपर्कातील इतरांची कोविड 19 च्या विषाणूपासून रक्षण करावे हे आहे. काही बेजबाबदार नागरिकांमुळे नियमांचे पालन करणार्या मोठ्या संख्येने असलेल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू नये यासाठी विशेष काळजी पालिकेकडून घेण्यात येत आहे.
हिवाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता
हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांमधील कोरोनाविषयीचे भय संपले असून, काही नागरिक खुलेआम फिरू लागले आहेत. हा नवी मुंबईसाठी संभाव्य धोका मानला जात असून धोका लक्षात घेत नवी मुंबई पालिकेने विशेष दक्षता पथक नेमण्यासाठी पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.