Breaking News

दुसर्या लाटेसाठी सज्जता हवी

जसजशी जगभरात थंडी वाढत जाईल तसतसा कोरोना विषाणूचा फैलाव अधिक वेगाने वाढताना दिसेल, असा इशारा जगभरातील शास्त्रज्ञ देत आहेत. रशिया आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये हिवाळ्यामुळे कोविड-19च्या दुसर्‍या लाटेचा तडाखा अधिक गंभीर स्वरुप धारण करत असल्याचे दिसून येतेच आहे. भारतातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी यापूर्वीच दिला आहे. हिवाळ्यात येऊ शकणार्‍या या संभाव्य दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असण्याची गरज आहे.

जवळपास आठवडाभर देशातील दैनंदिन कोरोना केसेसची संख्या आता 50 हजारांच्या खाली राहिली आहे. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 82 लाखांवर गेली होती. या आधीच्या 24 तासांत देशभरातून 45 हजार 231 नव्या केसेस नोंदल्या गेल्या होत्या. उपचार घेत असलेल्या (अ‍ॅक्टिव्ह) रुग्णांची संख्या सप्टेंबर मध्यावर 10 लाखांच्या वर गेली होती, ती सध्या सहा लाखांच्याही खाली घसरली आहे. हे प्रमाण आजवरच्या एकूण केसेसच्या आठ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.5 टक्क्यांवर कायम आहे. एकीकडे देशातील कोरोना परिस्थिती अशी दिलासादायक दिसत असताना युरोपात अधिकाधिक देशांना पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊनकडे वळावे लागत आहे याची नोंद आपण घ्यायलाच हवी. अमेरिकेतही कोरोना परिस्थिती पुन्हा गंभीर स्वरुप धारण करीत असून गेल्या आठवड्यात तिथे दिवसाकाठी लाखभर नव्या रुग्णांची नोंद होत होती. वाढत्या थंडीत कोरोनाचा फैलाव आणखी वाढतच जाणार असल्याचा इशारा जगभरातील तज्ज्ञ देत असतानाच यंदा भारतातील हिवाळा नेहमीपेक्षा अधिक कडाक्याची थंडी घेऊन येईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. प्रशांत महासागरातील ला नीना या हवामानविषयक विशिष्ट घटनेचा परिणाम अवघ्या जगभरातील हवामानावर होत असतो. तसाच तो भारतातही जाणवतो. आपल्यापैकी बहुतेकांना एव्हाना परिचयाच्या झालेल्या आणि भारतीय मान्सूनवर परिणाम करणार्‍या एल नीनोचाच हा एक भाग आहे. तर या ला नीनाच्या परिणामस्वरुपी यंदा देशाच्या उत्तर भागात तर कडाक्याची थंडी जाणवणार आहेच, पण मध्य महाराष्ट्रातही यामुळे पारा नेहमीपेक्षा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये यंदा ऑक्टोबरच्या अखेरीलाच पारा शून्यावर गेल्याचे दिसून आले. जम्मू आणि काश्मीरमधील थंडवारे उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचू लागले असून तेथे रात्रीचे तापमान नेहमीपेक्षा खाली घसरल्याचे जाणवू लागले आहे.  पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांमध्ये नेहमीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद होऊ लागली आहे. सगळी लक्षणे यंदाचा हिवाळा अधिक कठोर व अधिक काळ रेंगाळणारा असेल असे सुचवित आहेत. सर्वसाधारणपणे श्वसनाचे आजार असणार्‍या व्यक्तींचा त्रास हिवाळ्यात बळावतो. स्वाइनफ्लूच्या केसेसही हिवाळ्यात वाढताना दिसल्या होत्या. जरी आजवर कोरोनावर कुठल्याही हवामानाचा विशिष्ट परिणाम जाणवलेला नसला तरी युरोप-अमेरिकेत वाढत्या थंडीसोबत केसेस वाढताना दिसल्यामुळे जगभरातच त्या विरोधात इशारा देण्यात येतो आहे. आपल्याकडे येणारे दिवस सणासुदीचे आहेत. अनलॉकमध्ये अधिकाधिक व्यवहार खुले होत असून लोकांचा ट्रेन तसेच विमानातून होणारा प्रवास वाढतो आहे. या सार्‍याच्या परिणामस्वरुपी कोरोना केसेस वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याविरोधात सज्जताही वाढवण्याची गरज आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply