Breaking News

माथेरान घाट झालाय सुरक्षित आणि आधुनिक

पर्यटनासाठी महत्वाचा असलेले रस्ते शासन सुधारू शकत नसल्याचे चित्र आहे. पर्यटनाचा तालुका म्हणून आपली ओळख सांगणारा कर्जत तालुक्यातील रस्ते ही आर्थिक जीवनवाहिनी असताना देखील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मात्र माथेरान या जगाच्या पाठीवर वेगळेपण सांगणारे पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता नव्याने मजबूत केला आहे, पण रस्त्याचा पृष्ठभाग मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा आहे. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने जनतेच्या असंख्य तक्रार येऊन देखील केलेला कानाडोळा सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरत आहे.

माथेरान या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी नेरळ-माथेरान हा एकमेव रस्तामार्ग आहे. मध्य रेल्वेची नॅरोगेज मार्गावर नेरळ-माथेरान मिनीट्रेन 1909 मध्ये सुरू झाली. ही मिनीट्रेन 1970च्या दशकात रेल्वे संपामुळे बंद पडली होती.त्यावेळी  माथेरानला राहणार्‍या लोकांचे जीवनमान धोक्यात आले होते. माथेरान ग्रामस्थांनी रस्ता तयार करण्यासाठी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला आणि दस्तुरीपासून नेरळ असा घाटमार्ग अस्तित्वात आला. त्या घाटमार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाने 1982च्या रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट करून जिल्हा मार्ग म्हणून हेड मंजूर केला. तेव्हापासून या निमुळत्या घाट रस्त्याने नेरळ येथून जाण्यासाठी टॅक्सी वाहतूक सुरू झाली. 1999 पर्यंत अत्यंत अरुंद असलेल्या रस्त्याने जेमतेम एक कार जाऊ शकत होती, दुसरीकडे रस्त्याला दोन चार ठिकाणी सिमेंट कठडे बांधण्यात आले होते. पण तरीही हा रस्ता, तेथील जगाच्या जागी असलेल्या तीव्र वळणामुळे राज्यातील धोकादायक घाटरस्ता बनला होता. त्यात काही वाहने दरीत देखील कोसळली होती. त्यामुळे ही गंभीर बाब आमदार म्हणून निवडून आलेल्या सुरेश लाड यांनी मनावर घेतले. त्यावेळी राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात रस्ते विकासावर भर देण्याचा निर्णय घेतला आणि विविध पॅकेजबरोबर कोकण पॅकेज जाहीर केले.

कोकण पॅकेजमधून सुरेश लाड यांनी नेरळ-माथेरान घाटरस्त्याच्या कामाला कोकण पॅकेजचा निधी आणला. तब्बल सव्वा तीन कोटींचा निधी मिळाल्यानंतर नेरळ-दस्तुरी नाका रस्ता रुंद झाला तसेच अपघात ग्रस्त ठिकाणी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात संरक्षक भिंती बनविण्यात आल्या. त्यामुळे शासनाचे या रस्त्यावर राज्य परिवहन सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रथम सफल झाले. त्यानंतर कोकण पॅकेजमधून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग येथून माथेरानच्या दस्तुरी नाक्यापर्यंत जाणारा रस्ता अद्ययावत करण्यात येणार होता. परंतु मागील 15 वर्षात तसे कोणतेही काम राज्य सरकारच्या माध्यमातून झाले नाही. त्यामुळे पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमांमधून राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला या रस्त्याचे काम करण्यास सांगितले. मुंबईपासून जवळ असलेले थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेला एकमेव रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यामुळे अधिक आकर्षक बनला आहे. नेरळ ते माथेरान दस्तुरी नाका असा सात किलोमीटरचा घाटरोड पर्यटकांच्या वाहनांसाठी सुरक्षित बनला आहे. दरम्यान, यावर्षीचा उन्हाळी पर्यटन हंगाम रस्त्यामुळे अधिक सुरक्षित बनला आहे.

ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटन स्थळावर पोहचण्यास आजतागात केवळ दोन मार्ग अस्तित्वात आहेत. रोपवे आणि अन्य दोन ठिकाणी रस्ते बनवावेत अशी मागणी आहे, परंतु माथेरान परिसर हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने संवेदनशील बनविण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नवीन रस्ते साकारण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेला रस्ता सुस्थितीत ठेवून येणार्‍या पर्यटकांचा प्रवास हा विनाअडथळा आणि सुखकर तसेच अपघात मुक्त व्हावा यासाठी शासनाचा प्रयत्न होता. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून नेरळ पासून माथेरानच्या दस्तुरी नाका पर्यंतचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि या रस्त्याच्या कामासाठी 27 कोटींचा निधी मंजूर केला. रस्त्याची रुंदी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी वाढविण्याबरोबर सर्व रस्त्याला दरीकडे असलेल्या धोकादायक बाजूला संरक्षक भिंत आणि रस्त्यावरून पाणी वाहत जाऊन रस्ता खराब होतो हे नेहमीची समस्या लक्षात घेऊन सर्व रस्त्याला सिमेंटची गटारे बांधण्यात येणार होती. रस्त्यावर वाहने थांबवून ठेवण्यासाठी काही मोकळ्या जागा आणि सुरक्षित प्रवास होण्यासाठी आवश्यक गोष्टी यांची तरतूद एमएमआरडीएने आपल्या या प्रकल्पात केली होती. त्यानुसार नेरळ-माथेरान दस्तुरी नाका रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पर्यटकांसाठी सुरक्षित आणि आधुनिक सुविधा देणारा घाटरस्ता तयार झाला आहे. नेरळ येथील हुतात्मा चौकातून सुरु झालेल्या रस्त्यावर सात किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या संरक्षण भिंती यांच्या बाजूला रेडियमचे तुकडे चिटकविण्यात आले आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या मधोमध देखील पट्टे मारून रस्त्याची लेन निश्चित करण्यात आली आहे. चढाव, वळणे यांची माहिती देणारे तसेच शाळा आणि गाव असलेल्या ठिकाणी बनविण्यात आलेले गतिरोधक यांची माहिती देखील फलक लावून देण्यात आली आहे. ज्या काही ठराविक ठिकाणी अवघड वळणे नेरळ- माथेरान घाटरस्त्यावर आहेत, त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सिग्नल यंत्रणा सौरऊर्जेवर बसविण्यात आली असून त्यात एलइडी दिव्यांची सोय असल्याने करण्यात आल्याने वाहनचालक यांना देखील सिग्नल आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती यांना पिवळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे, त्यामुळे त्या भिंतीमुळे रस्ता अधिक सुरक्षित झाला आहे. नेरळ-माथेरान घाटरस्त्यात काही ठिकाणी अवघड चढाव आहेत, ते लक्षात घेऊन नव्याने आपली खासगी वाहने घेऊन येणारे वाहन चालक यांच्यासाठी गाडीची गती किती ठेवावी याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आणि वाहन चालक यांच्यासाठी नेरळ-माथेरान घाटरस्ता अधिक सुरक्षित बनला आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply