व्यवसायासाठी हिरवाई सुकविण्याची शक्कल; संबंधित विभागांचेही दुर्लक्ष
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा श्री सदस्यांनी हिरवाई फुलविली, मात्र कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आता तीच हिरवाई आपले व्यवसाय सुरू करणार्यांना त्रासदायक ठरत आहे. हिरवीगार झाडे सुकविण्याची अनोखी शक्कल लढवली जात असून कर्जत-कल्याण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, वन क्षेत्रात नसल्याने वन विभाग काही कारवाई करू शकत नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने ती झाडे लावली नसल्याने तेही काही करू शकत नाहीत. त्यामुळे डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान याबद्दल काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे मोठी झाली असून त्यामुळे परिसर हिरवागार बनला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या हातची कामे गेली आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते राज्यमार्गालगत अतिक्रमण करून आपल्या उदारनिर्वाहासाठी दुकाने थाटून बसल्याचेदेखील दिसत आहे. परिणामी नेरळ परिसरात रस्त्याच्या बाजूला असणार्या झाडाच्या बुंध्यावर कुर्हाड फिरवून त्यांना जीर्ण बनवण्याचे काम केले जात आहे. हिरव्यागार निरोगी झाडांना जीर्ण कऱण्यासाठी झाडांची साल काढली जाते. साल काढल्यावर झाडाची वाढ खुंटते व हळूहळू झाड कोरडे होते. वृक्षांच्या बुंध्याला कचरा जमा करून जाळण्यात येतो. त्यामुळे हळूहळू झाडाचा बुंधा जळतो. बुंधा जळाला म्हणजे झाड कमजोर होते आणि ते पाडण्यायोग्य करण्यात येते.
काही ठिकाणी झाडाच्या जॉइंटला पोकळ केले जाते. पोकळ झाल्यावर त्यात कचरा भरला जातो व झाड फाटते. काही ठिकाणी झाडे छाटली जातात, मात्र नंतर ती झाडे छाटताना विचारच केला जात नाही. सर्वच फांद्या तोडून टाकण्यात येतात व फक्त बुंधा आणि खोडच तेवढे उभे असते. त्यामुळे ते झाड पुन्हा बहरत नाही. वृक्ष संवर्धनाच्या नावाखाली शासनाच्या निधी खर्च होतो, मात्र प्रत्यक्षात जे वृक्ष आहेत त्यांना टिकविण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट त्यांचेही वेगवेगळ्या मार्गाने अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न होतो. नवीन लागवड होतेय, मात्र ती प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही. वृक्षतोडीसाठी दिल्या जाणार्या परवानग्या या वृक्षाची दुरवस्था झाल्याची कारणे न शोधताच दिल्या जातात. रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेल्या वृक्षांना कोणीही वाली नसल्याने या वृक्षांना तोडण्यायोग्य बनविण्यासाठी काही लोक वेगवेगळी शक्कल लढवून झाडांचा जीव घेत आहेत.
झाड वाळल्यावर ते तोडले जाते. अशा प्रकारे वृक्षांना जीर्ण करून मारण्याच्या प्रकारामुळे महामार्गावरील अनेक झाडे तोडली जात असल्याचे चित्र दिसत आहे. महाकाय निरोगी म्हटले जाणारे कडुनिंबाचे वृक्षही रोगाने ग्रस्त झाले आहेत. महामार्गावर किंवा इतर रस्त्यांवर असणार्या वृक्षांचीही अशी अवस्था का होतेय याचा शोध घेणे गरजेचे आहे. सदर बाब वन परिक्षेत्रातील नसल्याने वन विभाग कारवाई करण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे वृक्षतोड करणार्यांचे फावत आहे.