Breaking News

अवैध वाहनांवर नवी मुंबई आरटीओची कारवाई

नवी मुंबई : प्रतिनिधी

वाशी उपप्रादेशिक कार्यालय क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या छोट्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एनएमएमटी व एसटी प्रशासनाला दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत होते.

महापे ते कल्याणदरम्यान इको वाहन तसेच इतर खासगी वाहनांनाद्वारे नियमित नियमबाह्य प्रवासी वाहतूक बिनधास्तपणे सुरू होती. त्यामुळे रिक्षाचालक त्रासले होते, तर एनएमएमटी बससेवेला दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत होते. म्हणून वाशी आरटीओच्या वायूवेग पथकाने गुरुवारी 16 इको वाहने व खासगी छोट्या वाहनांवर मोटार निरीक्षक प्रशांत शिंदे व रमेश काल्लूरकर यांच्यासह कारवाई केली.

तसेच शनिवारी उरण फाटा, जुईनगर, ठाणे, बेलापूर महामार्गावरून अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या नऊ वाहनांवर आरटीओने कारवाई केली. ज्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली त्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर अवैध प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी दिली.

बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची आर्थिक लूट करणार्‍या व अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात यापुढे कडक धोरण आखले जाणार आहे. अशा 40 वाहनांवर मागील सहा दिवसांत कारवाई करण्यात आली आहे.

-हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply