Breaking News

शाळांचा पुनश्च श्रीगणेशा

कोरोनामुळे बंद असलेल्या गोष्टी हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरे काही दिवसांपूर्वी खुली झाली. आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंबंधी निर्देश दिले असले तरी पालक मात्र पाल्यांना सध्या शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

राज्यातील शाळा शासनाच्या निर्देशानुसार आजपासून सुरू होत आहेत. त्यामुळे कोरोना काळात मार्चपासून बंद झालेले विद्यालयांचे दरवाजे पुन्हा खुले होणार आहेत. त्यासाठी शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोविड आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शाळा चार दिवस उशिरा सुरू झाल्या तरी चालतील, पण कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याखेरीज शिक्षकांनी शाळेत येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी शाळा सुरू करताना प्रचंड गोंधळ दिसून येत आहे. चाचणीसाठी केंद्रांवर गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. पालक व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. पालकांच्या संमतीशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी पालकांना हमीपत्राविषयी माहिती दिली आहे, मात्र अनेक पालकांकडून मुख्याध्यापकांना अद्याप हमीपत्र मिळालेले नाही, तर अनेक पालकांकडून नकारघंटा ऐकावयास येत आहे. दुसरीकडे शाळेबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोडण्यात आल्याने काही ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या तारखा संबंधित पालकमंत्री, जिल्हाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पनवेल आदी महापालिका क्षेत्रांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत, तर पुण्यात 13 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर तेथील कोरोनाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, मात्र कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने ज्या ठिकाणी शाळा सुरू होत आहेत तेथील पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास सध्या तरी राजी नाहीत. युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. थंडीत रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या देशात उत्तरेकडील भाग वगळता इतरत्र थंडी अद्याप हवी तशी पडलेली नाही, पण दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढीवर झाला आहे. अशातच थंडी पडायला सुरुवात झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पालक आपल्या अपत्यांप्रति धोका पत्करायला तयार नाहीत. तसेही जवळपास आठ महिने शाळेविना गेले असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे नव्या वर्षीच शाळा सुरू व्हावी, असा त्यांचा सूर आहे. दुसरीकडे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेय की, शाळा सुरू करणे व विद्यार्थी शाळेत पाठविणे बंधनकारक नाही, पण शिक्षकांनी शाळेत जाणे आवश्यक आहे. याबरोबरच जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे. त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. खरंतर राज्य सरकारकडून सर्व संबंधित घटकांना विचारात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सावळागोंधळ पाहावयास मिळत आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply