नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मान्सून सोमवारी (31 मे) भारताच्या दक्षिण किनार्यावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे केरळच्या दक्षिणेकडील भागात पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे 31 मेपर्यंत केरळमध्ये पोहचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून या अगोदर स्पष्ट करण्यात आले होते. यास चक्रीवादळाने मोसमी वार्यांचे प्रवाह मोकळे केले आणि त्यांना चालना दिल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.