एक ठार; 13 गंभीर जखमी
पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील कोन गावच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत किमी 9.6 वर मध्यरात्रीच्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला असून एका या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबई सह एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्त झालेली बस ही सातार्यातून मुंबईकडे येत होती. त्यावेळी भाताण बोगदा गेल्यानंतर कोन गावच्या हद्दीत किमी 9.6 वर मध्यरात्री अचानक एसटीच्या उजव्या बाजूच्या लेनवरुन एक ट्रेलर आला व या ट्रेलरच्या चालकाने हयगयीने भरधाव वेगाने त्याच्या ताब्यातील गाडी चालवून ट्रेलरचा मागील कोपरा एसटीला घासत पुढे निघून गेला.
या झालेल्या अपघातात एसटी बसमध्ये असलेले गणेश रामदास कदम (36, रा.चानवाली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वाहक श्यामराव खवले (45), संतोष पाटेकर (49), शोभा पाटेकर (41), नारायण जगदाळे (53), राजू (पूर्ण नाव माहित नाही), बाळू हातेकर (50), लक्ष्मी हातेकर (40), स्वप्नाली हातेकर (16), अनंतराव धनवट (56), ज्ञानेश्वर कारंडे (57), अपेक्षा जगदाळे (23), बशीर शिकलगार (70), शहाजहाँ बशीर शिकलगार (65) यांना कमी अधिक प्रमाणात दुखापत झाली आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना अचानकपणे दणका बसल्याने जाग आली. त्यावेळी अनेक जण रक्तबंबाळ स्थितीत होते.
या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक, वाहतूक शाखेचे पथक, एक्सप्रेस विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तातडीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर ट्रेलरचालक पसार झाला होता. त्याला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुनील तारमाळे व त्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल एसटी आगार प्रमुख विलास गावडे व इतर अधिकारी व कर्मचार्यांनी सुद्धा जखमींना तातडीने मदत केली. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.