Breaking News

नवी मुंबईत 514 धोकादायक इमारती

पालिकेने केलेल्या विभागवार सर्वेक्षणातून माहिती

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2022-2023 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा सी-1 प्रवर्गामध्ये मोडणार्‍या 61 इमारती, इमारत रिकामी करून संचरचनात्मक दुरूस्ती करणे. सी-2 ए प्रवर्गामध्ये मोडणार्‍या 120 इमारती, इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा सी-2 बी प्रवर्गामध्ये मोडणार्‍या 282 इमारती तसेच इमारतीची किरकोळ दुरूस्ती अशा सी-3 प्रवर्गामध्ये मोडणार्‍या 51 इमारती, अशाप्रकारे एकूण 514 धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे. ही यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ’विभाग’ सेक्शनमध्ये अतिक्रमण विभाग माहितीच्या सेक्शनमध्ये सहज उपलब्ध आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 मधील तरतुदीच्या अनुषंगाने नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार घोषित इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक अथवा भोगवटादार यांना ते राहत असलेली इमारत निवासी अथवा वाणिज्य वापराकरिता धोकादायक असलेबाबत आणि या इमारतींमधील निवासी अथवा वाणिज्य वापर तत्काळ थांबविणेबाबत तसेच धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील 5 नोव्हेंबर 2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना अथवा नोटीस देण्यात आलेल्या आहेत. सी-1 प्रवर्गातील इमारतीची विद्युत व जल जोडणी खंडीत करण्यात येईल असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

अशा धोकादायक घोषित इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांना सूचित करण्यात येते की, ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा अथवा बांधकामाचा निवासी अथवा वाणिज्य वापर त्वरीत बंद करावा आणि सदरची इमारत अथवा बांधकाम त्वरीत विनाविलंब तोडून टाकावे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, इमारत अथवा  बांधकाम कोसळल्यास होणार्‍या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

धोकादायक इमारतींच्या वर्गीकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर अथवा रहिवास करणार्‍या नागरिकांनी इमारती तात्काळ निष्कासीत करावयाच्या आहेत किंवा वर्गीकरणानुसार इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणार्‍या भोगवटाधारकांनी इमारती दुरुस्ती करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रहिवाश्यांना आवाहन

पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा अथवा घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ शकते, म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा अथवा घरांचा रहिवास अथवा वापर तत्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घेण्यात यावी, असा इशाराही पालिकेने धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना दिला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply