Breaking News

वाढीव वीज बिले माफ करा!

विविध प्रांत कार्यालयांवर मनसेची धडक

कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करावे आणि वीज बिलात युनिटमध्ये जी सूट देण्याची घोषणा केली होती तो शब्द पाळावा, या मागणीसाठी कर्जत आणि खालापूर तालुका मनसेच्या  वतीने गुरूवारी (दि. 26) कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्य शासनाने वीज बिल कमी केले नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला. यावेळी प्रांत अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकातून निघालेला मोर्चा आमराई पुलावरून प्रांत कार्यालयावर पोहोचला. तेथे पोलिसांनी मोर्चेकरांना रोखले. यावेळी मनसेचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांना भेटून निवेदन दिले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष जे. पी. पाटील, जिल्हा सचिव प्रवीण गांगल, वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय दर्गे, कर्जत तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, तालुका उपाध्यक्ष यशवंत भवारे, प्रवीण बोराडे, महेंद्र निगुडकर, शहर अध्यक्ष समीर चव्हाण, सचिव प्रवीण पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक, महिला सरचिटणीस हेमलता चिंबुळकर यांनी पक्षाच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले.

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील सर्व शेतकरी आणि वीज ग्राहक यांना लॉकडाऊन काळात वाढीव बिले आली आहेत. राज्य शासनाने 100 युनिटच्या खालील वीज बिल माफ करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील वीज बिले कमी करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न केल्यास रायगड जिल्ह्यात मनसे स्टाईलने आंदोलन करू आणि त्यावेळी होणार्‍या परिणामांची जबाबदारी राज्य शासनाची राहील, असा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने वाढीव वीज बीलाची आकारणी करुन ग्राहकांवर अन्याय केला आहे. त्या विरोधात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26) पेणमधील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाने यावेळी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निघालेला मोर्चा आंबेडकर चौक मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला. मोर्चात मनसेचे संदिप ठाकूर, रूपेश पाटील, नागेश गावंड, नितिन म्हात्रे, सपना देशमुख, छाया शिंदे, सुनिल साठे, लता कळंबेकर यांच्यासह पेण शहर व तालुक्यातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माणगाव : प्रतिनिधी – ग्राहकांना  आलेल्या  वाढीव वीज बिलात सवलत द्या, या मागणीसाठी माणगाव व तळा तालुका मनसे तर्फे गुरूवारी (दि. 26) दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली माणगाव प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी वीज बिलाबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले. हे निवेदन अप्पर तहसीलदार श्री. वाघमारे यांनी स्वीकारले. 

महावितरण कंपनी व राज्य शासनाने वाढीव वीज बिलात सवलत द्यावी. अन्यथा यापुढे मनसेकडून जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र गायकवाड यांनी यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर वाढीव वीज बिले पाठवून राज्य सरकारने ग्राहकांना शॉक दिला आहे. या वीज देयकांतून राज्य सरकार जनतेची लूट करीत आहे. वाढीव वीज देयके पाठवून ग्राहकांना संघर्ष करायला भाग पडू नये. या विषयावर सामंजस्याची भूमिका घेत वीज देयकांत सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मनसेचे जिल्हा चिटणीस किशोर देशपांडे, माणगाव तालुकाध्यक्ष सुबोध जाधव, उपाध्यक्ष प्रतीक रहाटे, मनसे माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,  तालुका चिटणीस राजेश टेंबे, इंदापूर शहराध्यक्ष ओमकार मिरगुळे, सहसंपर्क प्रमुख चिमण सुखदरे, गोरेगाव शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष केतन गोरेगावकर, निजामपूरचे निखिल खेडेकर यांच्यासह मनसैनिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ग्राहकांनी वाढीव वीज देयके भरू नयेत. सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही. आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे.

– देवेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष, दक्षिण रायगड मनसे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply