देशभरात 60 हजार पेट्रोल पंप उभारण्यास आपल्याला 70 वर्षे लागली आणि आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना आवश्यक अशी व्यवस्था उभारण्यासाठी अधिकच वेळ लागेल. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग करिता सुमारे पाच लाख चार्जिंग स्टेशन्स उभारावी लागतील. हवामान बदल हे मानवतेसमोरील आजचे सर्वाधिक मोठे आव्हान असून निसर्गाशी सूर जुळवून घेत जगणे हा त्यावरील सर्वात मोठा उपाय आहे.
एकीकडे देशात सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची घोषणा केंद्रीय हवामान खात्याने केली आहे. मागील वर्षी देशातील उन्हाळा नेहमीपेक्षा बरा असण्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदवला होता, परंतु यंदा एल निनोच्या प्रभावामुळे नेहमीच्या भागांपेक्षा अधिक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. निव्वळ भारतातच नव्हे, तर जगभरातच पृथ्वीवरील वाढत्या तापमानाची सध्या गंभीर दखल घेतली जात असून वाहनांद्वारे होणारे कार्बनचे उत्सर्जन रोखण्याकरिता अनेक उपाय सुचवले जात आहेत. या चर्चा तज्ज्ञांच्या विशिष्ट वर्तुळांपुरत्या सीमित न राहता शक्य तितक्या वेगाने त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर आता जगभर भर दिला जात असून निव्वळ तेवढा बदल पुरेसा ठरणार नाही, तर आपले प्रवासाचे प्रमाणही कमी करावे लागेल असा सूरही तज्ज्ञ मंडळी लावू लागली आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही जागतिक स्तरावरील या चर्चेचा धागा पकडून हा विचार नुकताच देशातील एका परिषदेत अधोरेखित केला. निव्वळ सरकारी यंत्रणेकडे बोट दाखवून या समस्येवर उपाययोजना होणार नाही. अलीकडे जवळपास दरवर्षी हिवाळ्यात देशातील अनेक भागांमध्ये हवेचा दर्जा कमालीचा खालावतो व मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची नोंद होते. हे असेच चालू देणे परवडणारे नाही. आता राज्यातील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कशी दिसते ते पाहा. औरंगाबाद येथे एका 80 वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने उष्माघाताचा राज्यातील हा पहिला बळी ठरला आहे. तत्पूर्वी राज्यात उष्माघाताच्या 15 केसेसची नोंद गेल्या महिनाभरात झाली आहेच. येता आठवडाभर तरी राज्यात उष्म्याचा पारा चढाच राहील असा अंदाज केंद्रीय हवामानखात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी नागपूर जिल्ह्यातून उष्माघाताची 13 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर लातूर आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी एक प्रकरण नोंदवले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत उष्म्याचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला असून विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये एव्हाना पारा 43 अंशांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. देशाच्या पश्चिम भागाकडून येणार्या वार्यांमुळे उष्णतेची ही लाट आल्याचे सांगितले जाते. मुंबईत किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून ते नेहमीच्या सरासरीपेक्षा 2 अंशांनी अधिक आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 ते 33 अंशादरम्यान नोंदले गेले आहे. मुंबईतील कमाल तापमानही सरासरीपेक्षा 0.9 अंशांनी अधिक आहे. उन्हाच्या कहरामुळे नद्या, विहिरींतील पाणी पुरते आटले असून शासकीय यंत्रणा मोठ्या जिकीरीने ठिकठिकाणी पाणीपुरवठा करते आहे. अगदी महाबळेश्वरमध्ये सुद्धा पारा 34 अंश सेल्सिअसवर गेला आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत हवामान बदलाविषयी जागरुकता निर्माण झाल्याखेरीज हवामान बदलास रोखणे शक्य होणार नाही.