रायगड लोकसभा मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. असे असले तरी खरी लढत होणार आहे ती विद्यमान खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात. या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दोघांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहेे. काँग्रेस काय करणार यावर बरेच काही अवलंबून होते. सुनील तटकरे यांच्यावर नाराज असलेले काँग्रेसचे नेते त्यांना मदत करणार नाही असे वाटत होते, परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दुसरीकडे अनंत गीते यांच्यासाठी शिवसैनिकांबरोेबरच भाजपचे कार्यकर्तेदेखील मन लावून काम करीत आहेत. त्यामुळे या वेळीदेखील ही लढत 2014 प्रमाणेच चुरशीची होणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर सुनील तटकरे व अनंत गीते यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे या लढतीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रायगड मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना), सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), नथुराम भगूराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी), सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), मिलिंद भागूराम साळवी (बहुजन समाज पार्टी), मधुकर महादेव खामकर (अपक्ष), संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महा पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), तटकरे सुनील पांडुरंग (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) असे 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सुनील तटकरे यांनी लोकसभेची तयारी एक वर्षापूर्वीपासून सुरू केली आहे. त्यांचा मुलगा आमदार अनिकेत तटकरे व कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. 2014 साली शेतकरी कामगार पक्ष कागदावर का होईना तटकरेंच्या विरोधात होता. शेकापतर्फे रमेश कदम यांनी निवडणूक लढवली होती. कदम यांना 1 लाख 29 हजार 730 मते मिळाली होती. या वेळी शेकापने सुनील तटरे यांना पाठिंबा दिला आहे. ही तटकरे यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
शेकापने सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला असला तरी 2014 साली तटकरे यांच्या सोबत असलेले महेंद्र दळवी, अॅड. राजीव साबळे, श्याम भोकरे, समीर शेडगे, प्रकाश देसाई हे शिवसेनेत गेले आहेत. तटकरे यांचे अलिबागमधील विश्वासू साथीदार अॅड. महेश मोहिते राष्ट्रवादी सोडून भाजपत गेले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम गीते यांच्यावर नाराज असल्यामुळे त्यांनी 2014 सालच्या निवडणुकीत गीतेंचे काम केले नव्हते. ते या वेळी गीतेंचे काम करीत आहेत. काँगेसचे माजी मंत्री रवी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने अनंत गीते यांचा प्रचार करीत आहेत. गावोगावी जाऊन सभा घेत आहेत. सुनील तटकरे यांच्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी या सर्व बाबी अनंत गीते यांच्या पथ्यावर पडणार आहेत.
सुनील तटकरे यांच्या नावशी साधर्म्य असलेले आणखी दोन सुनील तटकरे या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे दोन अपक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील श्याम तटकरे हा अपक्ष उमेदवार उभा होता. या उमेदवाराला 9849 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा 2110 मतांनी पराभव झाला होता. या वेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासह सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे दोन उमेदवार जी मते घेतील ती तटकरेंचे नुकसान करणारी असतील.
2014 साली बहुजन समाज पार्टी, आप, समाजवादी पार्टी यांनी उमेदवार उभे केले होते. ते फारसे प्रभाव पाडू शकले नव्हते, मात्र या वेळी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार उभा केला आहे. मागील काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात अनेक सभा घेतल्या. त्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत होता. कोकणातही अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा मतदार आहे. वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचा पाठिंबा आहे. कोकणात खाडीपट्ट्यात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने यापूर्वी कुलाबा आणि आताच्या रायगड लोकसभा मतदासंघात आपला उमेदवार उभा केला नव्हता. या वेळी त्यांनी आपला उमेदवार उभा केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी रायगड लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार आहेत. त्या निवडून येण्याची शक्यता नाही, परंतु त्यांना मिळणारी मते कुणाला तरी पाडण्यास कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे दोन अपक्ष सुनील तटकरे व वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी किती मते घेतात यावर रायगड लोकसभा मतदारसंघातील निकाल अवलंबून राहणार आहे.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात