Breaking News

लोकसभा निवडणूक : सहा जण तडीपार, 180 शस्त्रे जमा

पनवेल : बातमीदार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान बळ, पैसा, आमिष यांचा वापर होणार नाही याकडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागते. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मधून सहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे; तर 180 जणांकडून परवानाधारी शस्त्र जमा करण्यात आली आहेत.परिमंडळ 2मध्ये पनवेल शहर, तालुका, कामोठे, कळंबोली, खांदेश्वर, खारघर, तळोजा या पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यावर परवानाधारक शस्त्र असलेल्या व्यक्तींना नोटीस बजावून शस्त्र जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार 180 परवानाधारी शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्रधारकांकडून येत्या काही दिवसांमध्ये त्यांची शस्त्रे जमा करून घेतली जाणार आहेत. परिमंडळ 2मध्ये बांधकाम व्यावसायिक, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते तसेच जीवाला धोका असलेल्या अनेक नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पिस्तूल, रिव्हॉल्वर व इतर प्रकारची शस्त्रे बाळगण्याचा परवाना घेतला आहे. गृहविभागाने लागू केलेल्या अटी व शर्थी पूर्ण केलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जातो. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता परवानाधारकाकडील शस्रे पोलिसांकडे जमा केली जात असल्याने शस्त्र बाळगणारे नागरिक स्वतःहून आपले शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करीत आहेत. ज्यांची शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करायची राहिलेली आहेत, त्यांनी लवकरात लवकर आपली शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावीत, असे आवाहन परवानाधारकांना करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास परवानाधारक शस्त्र असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारादेखील पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक तसेच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत सहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी काहींना तडीपार करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply