शेतकर्यांचे आर्थिक नुकसान
अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात या वर्षीच्या हंगामात 35 हमीभाव भात खरेदी केंद्रांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. भाताच्या मळण्यांची कामे वेगात सुरू असली तरी आतापर्यंत जेमतेम सात केंद्रांवरच प्रत्यक्ष भातखरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. व्यापारी पडत्या दराने भाताची खरेदी करीत असल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे.
यंदा जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगडकरांचे कंबरडे मोडले. त्यानंतर भाताची लावणी उशिरा झाली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यापोटी शासनाने देऊ केलेल्या तुटपुंज्या मदतीचे वितरण अद्यापही काही ठिकाणी झालेले नाही.
अशात यंदा शासनाकडून भाताला चांगला हमीभाव मिळेल अशी अपेक्षा होती. तीदेखील फोल ठरली. जुजबी वाढ देऊन भात पिकवणार्या शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकारने केले. मागील वर्षी सर्वसाधारण भाताला एक हजार 850 रुपये प्रतिक्विंटल असा दर आणि 700 रुपये बोनस देण्यात आला, तर अ दर्जाच्या भाताला एक हजार 865 रुपये प्रतिक्विंटल दर व 700 रुपये बोनस मिळाला. यंदा सर्वसाधारण भाताला एक हजार 868 रुपये प्रतिक्विंटल, तर अ दर्जासाठी एक हजार 888 रुपये प्रतिक्विंटल दर आणि दोन्हीला 700 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.
यंदा जिल्ह्यात 35 हमीभाव भातखरेदी केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे, पण जेमतेम सात केंद्रच आतापर्यंत सुरू होऊ शकलेली आहेत. उर्वरित केंद्र सुरू झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ती सुरूच झालेली नाहीत.
एकीकडे हमीभाव भातखरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत, तर दुसरीकडे खासगी व्यापारी पडत्या दराने भातखरेदी करीत आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, रोजगार बुडाला. त्यामुळे मुंबईतून येणारा पैसा थांबला. शेतकर्यांच्या हाती पैसा नाही. त्यामुळे मिळेल त्या दराने भात विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. जर भातखरेदी केंद्र वेळेत सुरू झाली नाही तर खासगी व्यापार्यांकडून शेतकर्यांची लूटमार सुरूच राहणार आहे.
ओल्या भाताचे कारण अमान्य
भातखरेदी सुरू न होण्यामागे भात ओला असल्याचे कारण यंत्रणेकडून पुढे केले जात आहे, मात्र शेतकर्यांना हे कारण मान्य नाही. साधारण 17 टक्केपेक्षा कमी आर्द्रता असलेला भात खरेदी केला जातो, परंतु आता परतीचा पाऊस जाऊन दीड महिना उलटून गेला. भाताच्या मळण्यांचा वेग वाढला आहे. शिवाय आर्द्रता मोजणारे यंत्र प्रत्येक भातखरेदी केंद्रावर उपलब्ध असते. त्यामुळे ओल्या भाताचे कारण मान्य नसल्याचे शेतकरी सांगतात.
या वर्षी रायगड जिल्ह्यात 35 हमीभाव भातखरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. सर्व केंद्र सुरू झाली आहेत, पण भात ओला असल्याने सध्या मोजक्याच केंद्रांवर खरेदी होत आहे. उर्वरित केंद्रांवर लवकरच भातखरेदी सुरू होईल.
-केशव ताटे, जिल्हा मार्केटींग अधिकारी, रायगड