नागोठणे : प्रतिनिधी
सरकारने तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने तुम्हाला खड्ड्यातच घालायचे ठरविले असून स्वतःला कोणतीही इजा न करता या रस्त्यावरून गाड्या चालवा, असा वाहन चालकांना संदेश देत रोहे तालुका मनसेकडून बुधवारी (दि. 9) सकाळी नागोठणे-रोहे मार्गावर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.
नागोठणे-रोहे मार्गावरील आंबेघरफाटा ते आमडोशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. सोमवारी सकाळी आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र एक दिवस काम केल्यानंतर मंगळवारपासून काम पुन्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी ठरविल्याप्रमाणे आज बुधवारी काही काळ सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले, असे रोहे तालुका मनसे चिटणीस प्रल्हाद पारंगे यांनी सांगितले.
या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पेणकर, रोहे तालुका चिटणीस प्रल्हाद पारंगे, मनविसेचे तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष विनायक तेलंगे, रोहे शहर अध्यक्ष मंगेश रावकर, माथाडी सेनेचे नागोठणे शहर अध्यक्ष नरेश भंडारी, हरिश्चंद्र तेलंगे, अंकुश पाटील, मनझर मुजावर, प्रफुल्ल पाटील, सचिन पारंगे, मनोज पारंगे यांच्यासह मनसैनिक सहभागी झाले होते. सुमारे पंधरा मिनिटे चालू असलेल्या या आंदोलनादरम्यान दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहुल मोरे यांच्याशी आताच संपर्क साधला असून, डांबर उपलब्ध नसल्याने काम थांबविले आहे व येत्या तीन चार दिवसांत कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पेणकर यांनी सांगितले. तीन चार दिवस नव्हे तर एक आठवड्यात काम चालू झाले नाही. तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग कार्यालयात येऊन मनसे स्टाईलने त्याचा जाब विचारला जाईल, असा इशारा राहुल मोरे यांना दिला आहे.