माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे प्रतिपादन
शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त – काँग्रेसने 1947पासून शेतकर्यांना दलालांच्या जोखडात बांधून ठेवले आहे. या अन्नदात्याला कृषी कायद्यांच्या माध्यमातून जोखडातून मुक्त करून सक्षम करण्याचे काम देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री तथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी शनिवारी (दि. 19) पनवेल तालुक्यातील शिरवली येथे केले. ते शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
देशातील तमाम शेतकरी बांधवांच्या उत्कर्षासाठी केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि भाजप किसान मोर्चाच्या वतीने कोकण विभागीय शेतकरी मेळावा पनवेल तालुक्यातील शिरवली येथे शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. बोंडे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, भाजपचे पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, किसान मोर्चाचे कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, नगरसेविका सीता पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, माजी पंचायत समिती सदस्य विजया सिनारे, परशुराम चौधरी, तुकाराम आदईकर, बाळाबुवा पाटील, भालचंद्र सिनारे, बाळकृष्ण बोंडे, हरी फडके यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. अनिल बोंडे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने शेतकर्यांसाठी हा जनजागरण मेळावा होत आहे. आमदार ठाकूर आपल्या मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी सातत्याने काम करीत असतात असे सांगून, महाराष्ट्रातील या पहिल्या मेळाव्याच्या नियोजनाबाबत आभार मानून समाधान व्यक्त केले.
डॉ. बोंडे पुढे म्हणाले की, कोरोना काळात शेतकरी शेतात राबला. बाकी सारे लॉकडाऊन होते. शेतकरी राबला म्हणून 80 कोटी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्नधान्य मोफत दिले. शेतकर्यांची जाण आणि त्यांच्या कष्टाचे मोल पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला माहीत आहे. म्हणूनच मोदी सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी ऐतिहासिक कृषी कायदे आणले आहेत, मात्र याचे श्रेय मोदी सरकारला जाईल म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांसारखे पक्ष कृषी कायद्यांच्या विरोधात अपप्रचार करून शेतकरी व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून शेतकरी व देशातील प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्याचे काम पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारकडून केले जात आहे. असे असताना विरोधक फक्त राजकारण करीत आहेत. सुधारित तीन कृषी कायदे शेतकर्यांच्या व नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक हमी मिळणार असून, त्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. शेतकर्यांना शेतमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य या कायद्यांतून दिले गेले आहे. बळीराजाला समृद्ध करणारे हे कायदे आहेत. या कायद्यांमध्ये काय वाईट नाहीये. असेल तर विरोधकांनी तसे सरकारला सांगावे. म्हणजे सुधारणाही करता येईल, पण विरोधकांनी फक्त अपप्रचार करू नये. काँग्रेसवाल्यांनीही आपल्या जाहीरनाम्यात एपीएमसी बंद करण्याचे जाहीर केले होते. आम्ही एक पाऊल पुढे टाकून या कायद्यांतून शेतकर्याला दलालीतून मुक्त करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, मात्र विरोधक त्या आडून राजकारण करीत आहे, याकडे डॉ. बोंडे यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील घटकांचा, सर्वसामान्य माणसाचा विचार करून विविध योजना राबविल्या. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे व तो समृद्ध झाला पाहिजे यासाठीही योजना आणल्या. शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात दरवर्षी तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले तसेच कोरोना काळात महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये जमा केले. राज्य सरकारने सर्वसामान्याला काहीही दिले नाही तिथे मोदी सरकार धावून आले. शेतकर्याला सन्मान व आर्थिक पाठबळ देण्याचे काम मोदी सरकारने केले, मात्र उद्धव ठाकरे सरकारने शेतकर्याला काय दिले, असा सवाल डॉ. बोंडे यांनी उपस्थित केला.
या वेळी बोलताना डॉ. बोंडे यांनी सुधारित कृषी कायद्यांना समर्थन असेल तर होकार द्या असे आवाहन केल्यानंतर उपस्थित शेतकर्यांनी दोन्ही हात उंचावून या कायद्यांना समर्थन असल्याचे दर्शविले.
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पायरीवर नतमस्तक होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला स्मरण करून मी पंतप्रधान नाही तर प्रधानसेवक म्हणून काम करण्याची शपथ घेतली आणि तेव्हापासून देशातील प्रत्येक नागरिकाला काय हवे आहे, देशाचा विकास कसा होईल, आपला भारत देश कसा सरस ठरेल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाला सुरुवात केली, विविध लोककल्याणकारी योजना अमलात आणल्या. त्याच अनुषंगाने मोदी सरकारने शेतकर्यांच्या हितासाठी आणि त्यांची दशा आणि दिशा बदलण्यासाठी कृषी कायदे आणले. काँग्रेसने त्यांच्या वचननाम्यात कृषी कायद्याचा उल्लेख केला, पण जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी शेतकर्यांच्या फायद्यासाठी हे कायदे अस्तित्वात आणले त्या वेळी मात्र या सार्याचे श्रेय पंतप्रधान मोदी व भाजप सरकारला जाईल असे वाटल्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोधाला विरोध करीत या कायद्यांचा अपप्रचार केला, लोकांमध्ये व शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण केला.
खरेतर हा कायदा शेतकर्यांच्या कल्याणासाठी आहे, शेतकर्यांची चोर आणि दलालांच्या जोखडातून सुटका करणारा आहे, मात्र विरोधक या दलालीतून शेतकर्यांना बाहेर पडून देत नाही, स्वार्थापोटी राजकारण करीत आहे. शेतकरी थेट पैसे कमवून सधन झाला तर विरोधकांना पोटदुखी का होत आहे असा सवालही आमदार लाड यांनी उपस्थित करून या तीन कृषी कायद्यांची शेतकर्यांना माहिती दिली.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सहा वर्षांचे काम हे अत्यंत उत्कृष्ट व जनतेच्या हिताचे राहिले आहे. विविध योजना त्यांनी राबवून तळागाळातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणीस यांनीही पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल टाकून काम केले. त्यांनी दुर्गम भागात मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ते निर्माण करून आदिवासी पाड्यांतील लोकांना दळणवळणाचे साधन दिले. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील या भागातील मुख्यमंत्री सडक योजनेचे काम होऊन सर्वसामान्य नागरिकाला विकासाची वाट दाखवली आहे.
ते पुढे म्हणाले, गेली अनेक वर्षे कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती ह्या शेकापच्या ताब्यात आहे, मात्र कुठल्याही प्रकारे या समित्यांच्या मार्फत शेतकर्यांचा विकास झाला नाही. स्थानिक शेतकर्यांच्या भाजीला भाव नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आणि त्यामुळेच शेतकरी गरीब राहिला. ही परिस्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने शेतकर्यांच्या हिताचा विचार करून तसेच शेतकरी, आदिवासी समाज अन्नदाता आहे, त्याच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी क्रांतिकारी कृषी कायदे आणले आहेत. त्यामुळे हा मेळावा मोदी सरकारने शेतकर्यांना, जनतेला जे कृषी कायदे दिले आहेत त्याबाबत आभार मानण्यासाठी आयोजित केला आहे.
शेतकर्यांना सुविधा मिळवून देण्याचे काम एपीएमसी, पंचायत समिती यांनी करणे क्रमप्राप्त होते, मात्र स्थानिक शेतकर्याला दूर सारून यांनी धनदांडग्यांसाठी काम केले असा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून कर्नाळा बँकेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व मानसिक हानी झालेली आहे. त्यामुळे शेकापवाले जेव्हा मते मागायला येतील तेव्हा त्यांना जनतेचे पैसे का परत करीत याचा जाब विचारा. मग त्यांना त्यांची जागा कळून चुकेल, असेही सांगितले.
किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांनी या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, एक अभ्यासू आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांची ख्याती आहे. आम्ही गाडीतून येत असताना माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी काही किस्से सांगितले. मी कृषिमंत्री असताना आमदार प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन माझ्या मतदारसंघात योजना द्या, विकासाची व शेतकर्यांची कामे करा असे हक्काने सांगून त्या कामांचा सतत पाठपुरावा करीत असत, असे बोंडे यांनी आम्हाला सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातूनच पनवेलमध्ये विकासाची गंगा आली. त्यांचे कार्य नेहमीच समाजाच्या उत्कर्षाचे आहे. एकनाथ देशेकर व हरी फडके यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यांनी शेकाप पुढार्यांच्या मतलबी कारभाराचा समाचार घेतला.
शेकाप म्हणजे शेतकरी कामगारांना लुटणारा पक्ष -आमदार प्रसाद लाड
शेतकर्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी हा कायदा आहे असे नमूद करून आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांवर टीकेची झोड घातली. या वेळी त्यांनी दुटप्पी शेतकरी कामगार पक्षाचा समाचार घेतला. शेकाप हा शेतकरी कामगारांना लुटणारा पक्ष आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला. विवेक पाटलांच्या कर्नाळा बँकेने गोरगरिबांचे, शेतकर्यांचे, कामगारांचे, व्यावसायिकांचे शेकडो कोटी रुपये खाल्ले. असे कायदे बनले पाहिजेत की विवेक पाटील यांच्यासारखे बँक लुटणारे घाबरले पाहिजेत, असेही त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पालक -आमदार प्रशांत ठाकूर
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिक हा सुजलाम सुफलाम् झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. महिला, बालक, युवा, ज्येष्ठ, शेतकरी, कामगार, व्यवसायिक, छोटे-मोठे उद्योग धंदेवाले अशा प्रत्येक घटकाच्या विकासासाठी त्यांनी आदर्श असे काम केले आहे. त्याचप्रमाणे देशाचे महत्त्वपूर्ण अंग असलेल्या शेतकर्यांच्या सन्मानासाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या. शेतकर्यांचा विकास व उत्कर्ष झाला पाहिजे त्यासाठी कृषी कायदे आणून शेतीत विविध प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पालक आहेत.
सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार काम करीत आहे, मात्र विरोधक या कामाचे श्रेय त्यांना जाऊ नये यासाठी विरोधाची भूमिका घेत आहेत. झोपलेल्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेणार्याला जागे करता येत नाही. त्याचप्रमाणे विरोधक झोपेचे सोंग घेऊन आहेत.
-वासुदेव काळे, प्रदेश सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा