Breaking News

भाजपचे ‘मिशन बंगाल’

देशावर अनेक वर्षे सत्ता गाजविणारा काँग्रेस पक्ष अंतर्गत मतभेद आणि नेतृत्व निवडीच्या गर्तेत अडकला असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्ष बिहारनंतर पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच केलेला बंगाल दौरा तेथील आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी आहे.

नव्या वर्षात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक होत आहे. तसे पाहिले तर आपल्या लोकशाहीप्रधान देशात सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुका होतच असतात. त्यामुळे बंगालमधील निवडणूक ही काही राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगी नसली तरी तेथील मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने या वेळची निवडणूक कसोटी पाहणारी आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून ममतादीदींनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. डाव्या पक्षांचा गड मानल्या जाणार्‍या बंगालची सत्ता मोठ्या हिमतीने व परिश्रमपूर्वक मिळविली, मात्र सत्तेवर बसल्यानंतर त्यांचा हेकेखोरपणा कमी होण्याऐवजी वाढल्याचे दिसून येते. म्हणूनच आज या राज्याला बांगलादेशी घुसखोरी, राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार आदी प्रश्नांनी जर्जर केल्याचे दिसून येते. जेव्हा एखादा राजकीय पक्ष व व्यक्ती नेतृत्व करीत असतो तेव्हा तेथील प्रदेशाचे यश-अपयशाचे उत्तरदायित्वही तेथील राज्यकर्त्यांचे असते. जिद्दी असलेल्या ममता बॅनर्जींकडून खरंतर बंगालचा विकास व प्रगती नागरिकांना अपेक्षित होती, मात्र चित्र याउलट दिसत आहे. शांतिदूत रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीत आज हिंसाचार कमालीचा उफाळला आहे. गुंडगिरी, हत्या यांसारख्या गुन्हेगारी घटनांनी बंगाल प्रांत बदनाम झाला आहे. त्यामुळे आता तेथे बदलाचे वारे वाहत आहेत. भारतीय जनता पक्षाने बंगालला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालचा दौरा केला. हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, महासचिव विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर काही दिवसांपूर्वी बंगालमधील डायमंड हार्बर येथे हल्ला झाला होता. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा भाजपचा आरोप आहे. यानंतर भाजपने तृणमूलला धडा शिकविण्याचा चंग बांधला आहे. शाह यांचा दौरा त्याचाच एक भाग मानला जात आहे. या दौर्‍यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे ममतादीदींना जोरदार धक्का दिला. मेदिनीपूर येथील जाहीर सभेत तृणमूलचे पाच आणि इतर सहा असे एकूण 11 आमदार तसेच तृणमूलच्या एक विद्यमान व एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. ‘कमळ’ हाती घेणार्‍यांमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा समावेश आहे, जे ममतांचे निकटवर्तीय मानले जात होते. नंदिग्राम परिसरात त्यांचे वर्चस्व असून, बंगालच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणूनही काम पाहत होते, मात्र ममतांच्या कारभाराला कंटाळून त्यांनी भाजपची वाट धरली आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरही तृणमूलला गळती लागली असून, अनेक छोटे-मोठे नेते, पदाधिकारी पक्षाला राम राम ठोकत आहेत. ममतांसमोर हे मोठे आव्हान आहे. त्यातच शाह यांच्या दौर्‍याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी काळात आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाल्यास आश्चर्य वाटायला नको. काहीही म्हणा शिस्त व नियोजन यामध्ये भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही. नाहीतर काँग्रेस. या पक्षाची पार वाट लागली आहे. बंगालमध्येही त्यांचे विशेष अस्तित्व नाही. सध्या काँग्र्रेसमध्ये सुंदोपसुंदी पाहावयास मिळत आहे, तर दुसरीकडे भाजप नवा प्रदेश काबीज करण्यासाठी केव्हाच कामाला लागला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply