पनवेल : वार्ताहर
मुंबईतील सायन कोळीवाडा या ठिकाणी मूळ वास्तव्यास असलेले ललित ज्ञानेश्वर मोहिते आणि रोहित ज्ञानेश्वर मोहिते काही वर्षांपूर्वी विचुंबे येथे राहण्यास आले. दरम्यानच्या काळात इंजिनियरींगचे शिक्षण घेवून दोन वर्षे नोकरी न मिळाल्यामुळे व लॉकडाऊनच्या काळात या दोन भावंडांनी स्वतःचा ज्युसचा व्यवसाय सुरू केला आहे. विचुंबे गावात सुरू केलेल्या ज्युस सेंटरला त्यांनी इंजिनियर ज्युसवाला असे नाव दिल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला आहे. मुळ गाव सातारा असलेले ललित आणि रोहित मोहिते हे दोन भाऊ काही चार वर्षांपासून पनवेलमधील विचुंबे येथे राहतात. लहान भाऊ रोहित मोहिते सिव्हील इंजिनियरींगमध्ये पदवीधर आहे, तर ललित याने इंजिनियरींगला अॅडमिशन घेतल्यानंतर रेल्वेत प्रशिक्षणार्थी म्हणून तीन वर्षे काम केले. मात्र काही कारणास्तव इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण झाले नाही. दोन्ही मुलांनी इंजिनियर व्हावे आईचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ललित सध्या मुंबईतील सोमय्या कॉलेजात मॅकेनिकल इंजिनियरींग डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिकतो आहे. सरकारी कॉलेजात फी कमी लागते, खासगी कॉलेजात शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे त्याने दहावीच्या 91 टक्के गुणांच्या जोरावर सोमैया कॉलेजात 2018 साली कॉलेजात प्रवेश घेतला. ललितचा लहान भाऊ मात्र पुण्यातील मोझे इंजिनियरिंग कॉलेजात 73 टक्के गुण मिळवून इंजिनियर झाला. तरीदेखील दोन वर्षांपासून नोकरी मिळू शकली नाही. वडील माथाडी कामगार असल्यामुळे घरची परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला. सहा महिन्यांनी ललित मॅकेनिकल डिप्लोमा इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण करेल. मात्र तरीदेखील घरी आर्थिक मदत करण्यासाठी इंजिनियर असलेल्या या बंधुंनी विचुंब्यात ज्युसचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी काही दिवस नवीन पनवेल येथील एका ज्युस सेंटरमध्ये ते विना मोबदला कामाला होते. तेथून त्यांनी सिझनल फळे कशी वापरावीत, साखरेचे प्रमाण, सिरपचे प्रमाण, बाजारपेठ आदींची माहिती घेतली. ललित मोहिते हा फिटनेस ट्रेनर व योगा इन्स्पेक्टर सुद्धा असल्याने तो त्यांच्याकडे येणार्या ग्राहकांना आरोग्यासाठी कोणता ज्युस आवश्यक आहे याची माहिती देतो. अत्यंत वाजवी दरअसल्याने ग्राहकांची गर्दी येथे चांगलीच असते. इतर ज्युसप्रमाणेच मलई, फालुदा ही त्याची स्पेशालिटी असल्याने ग्राहक याची चव आवर्जून घेतात. पनवेलजवळील विचुंबे या विभागात इंजिनियरिंग शिक्षण घेतलेल्या दोघा मराठी बंधुंनी इंजिनियर ज्युसवाला हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाबरोबर ग्राहकांनी त्यांच्या तब्येतीस आवश्यक असणारा कोणता ज्युस घ्यावा याचे मार्गदर्शनसुद्धा ते करीत असल्याने विचुंबे परिसरात मोहिते बंधू हे अल्पावधितच चर्चेचा विषय बनले आहेत.