पाली : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने पाली नगरपंचायत निवडणुकीत 13 पैकी 13 जागांवर उमेदवार दिले असून, पाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत मतदार भाजपला झुकते माप देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते पालीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाली नगरपंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जनतेला भाजपला बहुमताने सत्तेत संधी देण्याचे आवाहन केले. संकल्पनाम्यातील सर्व विकासकामे एक वर्षाच्या आत पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. असे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत राज्य व देशभरातून भाविक, पर्यटक येतात. मात्र राज्य सरकारकडून पाली शहर दुर्लक्षित राहिले आहे. येत्या काळात पाली शहर स्वच्छ, सुंदर व सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण व्हावे, यासाठी आम्ही काम करू. तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस सतिष धारप, जिल्हा अविनाश कोळी, युवा नेते वैकुंठ पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष हेमा मानकर, सुधागड तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, आलाप मेहता, भाजप सुधागड तालुका सरचिटणीस सागर मोरे, युवा मोर्चा सुधागड अध्यक्ष रोहन दगडे, केतन देसाई, उमेश मढवी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी,अजय खंडागळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पाली नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात भाजपच्या वैशाली राजेश मपारा (प्रभाग क्र 10), ऐश्वर्या मपारा (प्रभाग क्र 12), मनीषा रवींद्र ठोंबरे (प्रभाग क्र 16), सुचिता सतीश सकपाळ (प्रभाग क्र 15), श्रद्धा सुशील थळे (प्रभाग क्र 04), युसूफ पठाण (प्रभाग क्र 06), प्रवीण भालेराव (प्रभाग क्र 17), योगिता रवींद्र द्रविड (प्रभाग क्र 11), जुईली श्रीकांत ठोंबरे (प्रभाग क्र 01), जितेंद्र वामन केळकर (प्रभाग क्र 13), नंदकुमार रघुनाथ देशमुख (प्रभाग क्र 09), गणेश प्रभाकर सावंत (प्रभाग क्र 07) आणि जयश्री बळीराम जाधव (प्रभाग क्र 03) उमेदवार आहेत.