आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली तातडीची बैठक
चार दिवसांत जलवाहिनी पूर्ववत करून देण्याचे कंपनी अधिकार्यांचे आश्वासन
पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील खारेपाट विभागासह कासू, गडब विभागातील सर्वच गावांना गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. या भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी येथील संतप्त महिलांनी सोमवारी (दि. 4) कासू येथून हंडा मोर्चा काढून पेणचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांना निवेदन दिले. तर आमदार रविशेठ पाटील यांनी संबंधीतांची तातडीची बैठक घेवून खारेपाटातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
या खारेपाट विभागासाठी जेएसडब्ल्यू कंपनीच्या पाईपलाईनमधून गेल्या अनेक वर्षापासून पाणी मिळत आहे. मात्र ही पाईपलाईन जीर्ण झाल्याने काही ठिकाणी फुटली आहे. परिणामी या भागातील लोकांना या पाईपलाईनमधून पाणी पोहोचत नाही. ते लक्षात घेवून कंपनीने दुसरी पाईपलाईन टाकली आहे. तरीसुध्दा खारेपाटासह कासू, गडब विभागातील सर्वच गावांना पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या विभागातील ग्रामस्थ विशेषत: महिला संतप्त झाल्या आहेत. त्यांनी सोमवारी हंडा मोर्चा काढून विभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले.
दरम्यान, रविशेठ पाटील यांनी खारपाटातील पाणी प्रश्नासंदर्भात पेण येथील उपविभागिय कार्यालयात सोमवारी (दि. 4) संबंधितांची बैठक घेतली. या बैठकीला उपविभागिय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, गटविकास अधिकारी सी. पी. पाटील, माजी सभापती बाळाजीशेठ म्हात्रे, जेएसडब्ल्यू कंपनीचे महाव्यवस्थापक जनसंसंपर्क अधिकारी बळवंत जोग, कुमार थत्ते, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर, वडखळ सरपंच राजेश मोकल, दिनेश म्हात्रे, संदिप कडू, संदिप म्हात्रे, अशोक पाटील, मसद सरपंच बळीराम भोईर, तृप्ती पाटील, वासुदेव म्हात्रे आदिसह विभागातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकार्यांनी दुसर्या नवीन पाईपलाईनवरुन हॉटेल, ढाबेवाल्यांना पाणी दिल्याची तक्रार गावकर्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या समोर केली. त्यामुळेच खारेपाट विभागात पाणी येत नसल्याचे महिलांनी ठामपणे सांगितले व या अधिकार्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी या महिलांनी केली.
जेएसडब्ल्यूची जुनी पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा, नविन पाईपलाईन लवकरात लवकर सुरु करावी, जीवन प्राधिकरणाची योजना सुरु करावी, तातडीने टॅकरव्दारे या भागातील गावाना पाणी पुरवठा करण्याच्या सूचना यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या. चार दिवसात जलवाहिनी पूर्ववत करून देण्याचे आश्वासन जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकार्यांनी या बैठकीत दिले.