Breaking News

नियमांचे पालन करा; अन्यथा येऊ नका!

क्विन्सलॅण्डच्या सरकारने टीम इंडियाला सुनावले

सिडनी : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या (बायो बबल) नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)कडून चौकशी सुरू आहे. अशातच कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढवल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना आता क्विन्सलॅण्डच्या आरोग्यमंत्री रोज बेट्स यांनी, ‘जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी क्विन्सलॅण्डला येऊ नये’ अशा शब्दांत सुनावले आहे.
क्विन्सलॅण्डमध्ये विलगीकरणाचे कठोर नियम असल्याने ब्रिस्बेनऐवजी सिडनीलाच लागोपाठ दोन कसोटी सामने खेळवावेत अशी भारताची मागणी असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिले आहे. याबाबत आरोग्यमंत्री रोज बेट्स यांना भारतीय संघाला विलगीकरणातून सूट मिळणार का, असा प्रश्न माध्यमांनी प्रश्न विचारला. बेट्स यांनी जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी क्विन्सलॅण्डला येऊ नये, असे म्हटले.
क्विन्सलॅण्डचे क्रीडामंत्री टीम मेंडर यांनीही नियम सर्वांसाठी सारखे असून, प्रत्येकाला त्याचे पालन करावे लागेल. जर भारती खेळाडूंना नियमांतून सूट हवी असले तर त्यांनी क्विन्सलॅण्डला येऊ नये, असे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून यावर काय उत्तर दिले जाते याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याला वासिम जाफरचे प्रत्युत्तर
मुंबई : ‘जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये’ अशा शब्दांत भारतीय संघाला सुनावणार्‍या क्विन्सलॅण्डच्या आरोग्यमंत्री रोज बेट्स यांना भारताचा माजी खेळाडू वासिम जाफर याने सडेतोड उत्तर दिले आहे. ट्विटरवर एक शानदार मिम शेअर करीत जाफरने रोज बेट्स आणि क्विन्सलँडच्या सरकारला उद्देशून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘ऑस्ट्रेलियाच्या मंत्री म्हणतात आमच्या नियमांनुसार खेळा किंवा येऊ नका. त्यांच्या अशा विधानामुळे भारतीय संघ बॅगमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टाकून परतण्यासाठी निघालाय’ अशा आशयाचे ट्विट जाफरने केले आहे. या ट्विटसोबत जाफरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा कॅप्शनला साजेसा असा एक फोटो जोडला असून, त्यात स्मित हास्य
करणार्‍या आर्चरने पाठीला बॅग टांगलेली दिसत आहे. नेटकर्‍यांना जाफरचे हे उत्तर चांगलेच पसंतीस पडले असून, त्यावर युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
तूर्तास चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच
कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढवल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले होते, मात्र तूर्तास चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौथा कसोटी सामना 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यू साऊथ वेल्सहून क्विन्सलँडच्या प्रवासास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे, परंतु खेळाडू बायो बबल वातावरणात असल्याने त्यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आला आहे. ब्रिस्बेनचा सामना हलवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप तरी कोणतीही विनंती ‘सीए’कडे केलेली नाही.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply