Breaking News

कोरोना आणि काँग्रेस

पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादची भारत बायोटेक या दोन औषध कंपन्यांनी अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी शोधून काढल्या. केंद्र सरकारच्या औषध विभागाने आपत्कालीन वापरासाठी त्यांना मान्यतादेखील दिली. ही दोन्ही औषधे पूर्णत: भारतीय बनावटीची असून त्याबद्दल सर्व देशवासियांना अभिमान वाटावा. आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी जे आवाहन केले होते, त्याला शास्त्रज्ञांनी दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद आहे. परंतु काँग्रेस पक्षाला भारतीय शास्त्रज्ञांचे कर्तृत्व मान्य नसावे.

पक्षासमोर कुठलाही कार्यक्रम उरला नसला की विरोधासाठी विरोध हा एकमेव कार्यक्रम विरोधीपक्षांकडे उरतो. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे नेमके हेच झाले आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी काँग्रेसचे वाईट दिवस सुरू झाले. त्यांचे नष्टचर्य अजुनही थांबायला तयार नाही. अर्थात याला जबाबदार काँग्रेसचे नेतेच आहेत हे आता सार्‍या देशाला कळले आहे. केंद्रातील मोदी सरकारला पावलापावलावर विरोध करणे यापलीकडे काही कामच काँग्रेस पक्षाला उरलेले नाही. सत्ताधार्‍यांना विरोध करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहे. परंतु हा विरोध विधायक स्वरुपाचा हवा असे संविधानाला अभिप्रेत आहे. सत्ताधारी पक्षाला विरोध करताना आपण देशहिताच्या आड तर येत नाही ना याची काळजी विरोधी पक्षाने घ्यावी ही अपेक्षा रास्तच. परंतु काँग्रेस आणि अन्य काही विरोधी पक्षांनी गेल्या काही वर्षांत इतक्या टोकाला जाऊन विरोध दर्शवला की या पक्षांमधील सद्सद्विवेक बुद्धी संपुष्टात आली की काय असे कोणालाही वाटावे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी या विरोध मोहिमेत आघाडीवर असतात हे या देशाचे दुर्दैव. सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लस भारतीय शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या शोधून काढल्याने देशभर उत्साहाची लाट उसळलेली आहे. परंतु या भारतीय बनावटींच्या लसींवरून ना-ना प्रकारच्या शंका-कुशंका आणि आरोप यांचा सपाटा काँग्रेस आणि अन्य विरोधीपक्ष नेत्यांनी लावला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष हाती येण्याआधी मान्यता मिळालीच कशी, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. या लसीवर लोकांचा विश्वास बसावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ही लस पहिल्यांदा टोचून घेतली पाहिजे असा हास्यास्पद आग्रह काही काँग्रेस नेत्यांनी धरला. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तर काँग्रेसपेक्षाही खालची पातळी गाठून दाखवली. भाजपची लस मी टोचून घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत सारा देश एकजुटीने प्रयत्नांची शर्थ करत असताना त्यात पक्षीय राजकारण आणणे ही अतिशय लांछनास्पद बाब आहे. मुख्य म्हणजे, लस शोधून काढणार्‍या शास्त्रज्ञांचा हा धडधडीत अपमान आहे. लस किंवा औषधाला जातपात, धर्म, पंथ असे काही नसते. तसेच त्यांना पक्षीय रंग देणे निषेधार्ह गोष्ट आहे. परंतु हे शहाणपण विरोधी पक्षांना सांगण्यात काही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोकाचा द्वेष आणि आपल्या वाट्याला आलेले राजकीय वैफल्य या दुहेरी भावनेतून असल्या प्रकारचे विरोधी सूर उमटत असतात. या नकारात्मक राजकारणाकडे नागरिकांनी दुर्लक्षच केलेले बरे. सध्या देशात कोरोना आणि काँग्रेस या दोघांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे असेच म्हणावे लागेल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply