Breaking News

सुपारी पिकविणारे बागायतदार अडकित्त्यात

कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. कोकणातील समुद्रकिनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे.झाडावर आलेली सुपारी काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी केल्यावर व प्रक्रिया केल्यावर ती बाजारात विक्रीस आणली जाते. मुरूड तालुक्यात सुमारे 200 हेक्टर जमिनीवर सुपारी पिकाची लागवड केली जाते.घराच्या बाजूलाच बागायत जमीन व तिथे उंच अशी नारळ व सुपारीची झाडे सहज पाहावयास मिळतात. सुपारीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी मुरूड तालुक्यात सुपारी खरेदी-विक्री संघाची स्थापना करण्यात आली आहे. या संघाद्वारे तालुक्यातून सुपारी येथे जमा केली जाते. त्यानंतर संघातील पदाधिकारी सर्वोत्तम भाव मिळावा यासाठी ना नफा तत्त्वावर  सर्व कार्यवाही करीत असतात. मुरूड तालुक्यात असणार्‍या सुपारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक उलाढाल आठ कोटींची असून सुमारे 1300च्या वर सभासद संख्या आहे. सर्व सभासदांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी सुपारी संघ चांगली मेहनत घेऊन असणार्‍या सभासदांसाठी उत्तम कार्य करीत असते. मुरूड सुपारी संघाची अधिक माहिती सांगताना या संस्थेचे चेअरमन महेश भगत यांनी सांगितले की, आमचा कार्यविस्तार संपूर्ण मुरूड तालुक्यात असून तालुक्यातही सुमारे 1300च्या वर सभासद संख्या आहे. असणारे सर्व सभासद सुपारी आमच्याकडे जमा केल्यानंतर त्यावर आम्ही विविध प्रक्रिया करीत असतो. उदाहरणार्थ सुपारीची कापणी करून विविध गटवारी करून अनेक प्रक्रिया केल्यावर ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असते. व्यापारी लोकांना सुपारी खरेदीसाठी टेंडर काढले जातात. सुपारीची प्रतवारी बघून जो व्यापारी चांगला भाव देईल त्याच्याशी सुपारीचा सौदा केला जातो. आपल्या मुरूड तालुक्यातून मोहरा त्याचप्रमाणे मोहरा 1, मोहरा 2, फकोर अशा जातीची सुपारी मिळत असते. लोकांना सुपारीसाठी भटकावे लागू नये यासाठी सुपारी संघाद्वारे सुपारी विकून सर्वोत्कृष्ट भाव मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे या वेळी चेअरमन महेश भगत यांनी सांगितले.  सुपारी झाडावर पिवळी धमक दिसते, परंतु तिला झाडावरून काढल्यानंतर कडक उन्हात खूप दिवस सुकवल्यानंतर संघात आल्यावर विविध प्रक्रियेला सामोरे जावे लागते. या उद्योगामुळे असंख्य गृहिणींना स्वयंरोजगारही प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे असंख्य लोक या खरेदी-विक्री संघात काम करीत असून रोजगार मिळण्यास उपयुक्त ठरला आहे, परंतु हे सर्व असले तरी सुपारी या पिकालासुद्धा अनेक संकटांना सध्याच्या घडीला तोंड द्यावे लागत आहे. बाजारात घटत चाललेले दर, अवेळी पडणारा तथा लांबलेला पाऊस, हवेतील वाढलेले उच्चांकी तापमान, जमिनीतील खोलवर पाण्यात वाढलेले क्षाराचे प्रमाण व झाडांवर, पिकांवर पडणारे विविध रोग, तसेच 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळामुळे असंख्य सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने  बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ मुरूड तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातीलच सुपारी बागायतदार अडचणीत सापडले आहेत. अगामी सुपारी हंगामच अडकित्त्यात कातरला गेला आहे. मुरूडसह श्रीवर्धन, अलिबाग, म्हसळा, रोहा तालुक्यातील शेतकरी भाताच्या पिकाबरोबरच सुपारी व नारळ पिकाचे उत्पादन घेतात. मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील तर कित्येक जण केवळ सुपारी, नारळाच्याच एकमेव उत्पादनावर आपली गुजराण करतात. गेली अनेक वर्षे अशा बागायतदार शेतकर्‍यांना या पिकाने मदतीचा हात दिला आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून या उत्पादनाला जणू नजर लागली आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 715 हेक्टरवर सुपारीच्या बागा असून एकट्या मुरूड तालुक्यात जवळपास 1300  बागायतदार आहेत. मुरूड व श्रीवर्धन तालुक्यातील सुपारीची प्रतवारीही उच्च आहे. श्रीवर्धनची रोठा सुपारी  तर प्रसिद्धच आहे. एक एकर जमिनीवर लावलेली सुपारीची झाडे पाच-सहा वर्षांत आठ क्विंटल तर हेक्टरी आठ नऊशे क्विंटल सुपारीचे येथे सरासरी उत्पादन आहे. मुरूड तालुक्यात प्रतिवर्षी 700 ते 800 खंडी (एक खंडी=20 कि. ग्रॅ.) उत्पादन घेतले जाते.गतवर्षी येथील सुपारी संघाने दर मणी तीन हजार पाचशेचा भाव दिला होता. पावसाळ्यात मोठ्या झालेल्या फळांवर कोळे रोगाची लागण होते. शिवाय सुपारीची फळे मोठी होत असताना त्यांचा मागील भाग चिरून आतील गर कुजून जातो. सुपारीच्या झाडाला आळंबी नावाचा रोग होतो व उभे झाड वाळून जाते, तसेच त्याला बांड नावाचाही रोग झाल्यास त्याच्या झावळ्या लहान होऊन ते मरून जाते. शेंडेमर, करपा अशा अनेक रोगांशी सामना करीत जे पीक शेतकर्‍यांना मिळते ते अत्यल्प असते. शिवाय हल्ली सुपारीच्या झाडांवर चढून पिकलेली सुपारी पाडणारे पाडेकरीही मिळत नाहीत.सुपारीची सालपट पासटणार्‍या स्त्रियाही उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या मजुरीतही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळेच हे सर्व सुपारी पिकवणारे बागायतदार अडकित्त्यातच सापडले आहेत. शासन त्यांना कोणतीही मदत करीत नाही. ज्याप्रमाणे डाळींब, आंबा, संत्री आदी पिकांना शासनाकडून संरक्षण देण्यात येते, त्याप्रमाणे कोकणातील सुपारीचे पीक घेणार्‍यांकडेसुद्धा शासनाने सहानुभूतीपूर्वक बघून संकटकाळी मदत करावी, अशी येथील शेतकर्‍यांची मागणी आहे. 3 जूनच्या चक्रीवादळात असंख्य सुपारीची झाडे उन्मळून पडून कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले, परंतु शासनाकडून मात्र सुपारीच्या झाडाला 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये अशी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सुपारीला चांगला भाव मिळत असूनसुद्धा प्रत्यक्षात मात्र बागायतदारांना असंख्य संकटांमुळे पुरेसा भाव मिळत नसल्यामुळे बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत.

-संजय करडे

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply