Breaking News

प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पास स्थानिकांचा विरोध रास्त; मनसे शेतकर्यांच्या पाठीशी; बाळा नांदगावकर यांची ग्वाही

रेवदंडा : प्रतिनिधी

तळेखार ते वाघूलवाडी परिसरातील शेतकर्‍यांचा प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पास रास्त विरोध असून, मनसे या शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल. वेळ पडल्यास येथे खळ खट्याक आंदोलन छेडू, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चोरढे येथे दिला. तळेखार ते वाघूलवाडी येथील प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. मनसे उपजिल्हाप्रमुख महेश कुन्नमल व चोरढा सरपंच महेंद्र शेडगे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तळेखार ते वाघूलवाडी शेतकर्‍यांच्या वतीने निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन राज ठाकरे यांनी प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्प भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी बाळा नांदगावकर यांना पाठविले होते. नांदगावकर यांनी या दौर्‍यात शेतकर्‍यांची मते समजून घेतली. त्यानंतर चोरढे येथील सभेत बाळा नांदगावकर बोलत होते. येथील प्रस्तावित एमआयडीसीमुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांचे गार्‍हाणे राज ठाकरे यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, येथील जमीन सुपीक असून इथे बाराही महिने पीक घेतले जाते. त्यामुळे प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पास जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छीमारी केली जाते. त्यावर मच्छीमारांचा उदरनिर्वाह  होतो. या खाडीत कंपन्यांचे सांडपाणी सोडले, तर येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल. शेती सुजलाम् सुफलाम् असताना येथे एमआयडीसी हवी कशाला, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. सभेचे प्रास्ताविक चोरढा सरपंच महेंद्र शेडगे यांनी केले. मुरूड पं. स. उपसभापती चंद्रकांत मोहिते, राजेंद्र सुतार, विपीन खोत, विकास आमलीकर आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले. मनसेच्या राज्य उपाध्यक्ष स्नेहलताई जाधव, मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेश कुन्नमल यांच्यासह स्थानिक शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply