महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे आंदोलन केले ते अहिंसावादी होते, परंतु ब्रिटीश सरकारने ते पायदळी तुडवून हिंसेचा मार्ग पत्कारून अनेक लोकांचे बळी घेतले. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि हिंदुस्थानला पारतंत्र्यातून मुक्त करून स्वातंत्र्य द्यावे लागले. त्याच धर्तीवर लोकनेते दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्त, शेतकर्यांचे आंदोलन अहिंसात्मक मार्गाने केले, मात्र 1984 सालच्या काँग्रेस सरकारने इंग्रजांचा वारसा जपून आंदोलन पायदळी तुडविले व हिंसक मार्ग अवलंबून बेछूट गोळीबार करून पाच लोकांचे बळी घेतले. शेवटी इंग्रजाप्रमाणे काँग्रेसनेही दि. बा. पाटील यांच्यापुढे नमते घेऊन शेतकर्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे ‘दिबां‘चा साडेबारा टक्के कायदा जन्माला आला. हे त्यांचे अजरामर काम आहे. ज्या ज्या वेळी शेतकरी आंदोलन आठवते त्या त्या वेळी ‘दिबां’ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
‘दिबा’ निस्वार्थी होते. पैशाचा त्यांना हव्यास नव्हता. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही त्यांची ख्याती. सात वेळा आमदार, दोन वेळा खासदार होऊनही ते शेवटपर्यंत साध्या घरात राहत होते. विशेष बाब म्हणजे ‘दिबां’च्या पत्नी या माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. त्या निवृत्त होईपर्यंत कार्यरत राहिल्या. ‘दिबा’ राजकारणी जरूर होते, तसेच समाजकारणीही होते. पनवेल येथे लोकवर्गणी जमवून त्यांनी कॉलेज काढले. त्या कॉलेजला ‘दिबां’चे नाव देण्यात आग्रह लोकांनी धरला, परंतु त्यांनी नकार दिला. ते महात्मा ज्योतिबा फुलेंना दैवत मानत. त्यांचे नाव देऊन आपला मोठेपणा दाखविला. पनवेलमध्ये पनवेल-उरण आगरी समाज मंडळाची स्थापना करून तीन मजली सुसज्य अशी भव्य इमारत उभी केली. तिथे निरनिराळे उपकम राववून आगरी समाजाबरोबर इतर समाजाला सोबत घेऊन विशेष प्राविण्य मिळलेल्या व्यक्तींचा गौरव दरवर्षी केला जातो. सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी वधू-वर सूचक मंडळ स्थापन करून अनेक विवाह जमविले जातात. त्यामुळे लोकांना दिलासा मिळतो. ‘दिबा’ पनवेलचे नगराध्यक्ष असताना अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी मनात आणले असते तर पनवेलचे अर्धे साम्राज्य ताब्यात घेतले असते, परंतु ते निस्वार्थी होते. मरणानंतर लोकांना त्यांच्या खर्या कार्याची किंमत कळते. ‘दिबां’चे कार्य हे जनहिताचे होते, तसेच राजकारणसुद्धा निस्वार्थी होते. ‘दिबा’ स्वाभिमानी होते, परंतु
अभिमानी नव्हते.
‘दिबा’ शेकापचे कट्टर होते. कष्टकर्यांचे नेते जनार्दन भगत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार दत्तूशेठ पाटील, हे त्यांचे डावे-उजवे हात होते, परंतु जनार्दन भगत स्वर्गवासी झाल्यावर ‘दिबां’वर शेकापमध्ये अन्याय होत आहे, असे दिसले. त्यामुळे त्यांनी त्याचा खासदारकीचा वारसा हक्काने रामशेठ ठाकूर यांना देऊन व त्यांचे निष्ठेने काम करून तो जपला. पुढे रामशेठ ठाकूर यांनी शेकाप सोडल्यानंतर या पक्षात ‘दिबां’ना प्रत्येक वेळी डावलण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांनी शेकापचा रितसर राजीनामा देऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेथेही राजकारणात पुढे न जाण्यासाठी कट-कारस्थान झाले व ‘दिबां’ना बाळासाहेबांनी दिलेला शब्द या बारभाई कारस्थांनी मागे घ्यायला लावले. येथेच ‘दिबां’चा स्वाभिमान उसळला व त्यांनी शिवसेनेला ‘जय ‘महाराष्ट्र करून ते बाहेर पडले. शिवसेनेतून अनेक नेतेही शिवसेनेबाहेर पडले. शिवसेनेने अनेक बलाढ्य नेते गमावले. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे त्याचबरोबर छोटे-मोठे नेते बाहेर पडले. दि. बा. पाटील शिवसेनेत असते तर त्यांनी ही गतीविधी थांबविली असती. कारण ते विचारी संघटक होते.
यानंतर ‘दिबा’ राजकारण सोडून समाजकारण करू लागले व ते त्याच कार्याच्या जोरावर अमर झाले. मरावे परी किर्तीरूपे उरावे या उक्तीप्रमाणे लोकनेते ‘दिबां’चे कार्य आज कळायला लागले. ‘दिबा’ हे आंदोलनाचे बादशहा होते. अनेक आंदोलने त्यांनी केली आणि ती बहुतांशी यशस्वी झाली. ‘दिबा’ मूळेच उरण तालुक्यातील जासई गावचे, परंतु ते सुरुवातीला वकील झाल्यावर पनवेल येथे त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र उघडले, पण त्यांची जेवढी आंदोलने झाली ती प्रामुख्याने उरणमध्ये झाली. याच आंदोलनातून त्यांचा नावलौकिक झाला.
‘दिबां’बद्दल किती लिहिले तरी अपुरेच पडणारे आहे. हयात असते तर सांगितले नसते, पण मरणानंतर या देशात महान कार्य करणार्या नेत्यांची नावे देऊन त्यांच्या कार्याची बूज राखतात. जागतिक कीर्तीचे विमानतळ हे पनवेल तालुक्यात शेतकर्यांच्या जमिनीवर होत आहे. ‘दिबा’ हे शेतकर्यांचे नेते होते व ‘दिबां’चे कार्य हे या भागात सर्वांपेक्षा महान आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे. यातच महाराष्ट्राची
शान राहील व ‘दिबां’ना मरणोत्तर खरी श्रद्धांजली ठरेल.
-धनंजय गोंधळी, ज्येष्ठ पत्रकार