खारघर : प्रतिनिधी
पनवेल येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व खारजमीन संशोधन केंद्र पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीमध्ये मत्स्य पालनाचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. मत्साशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
भातशेतीतील मत्स्य संवर्धनाचे फायदे, माशांचे आहारातील महत्व, मत्स्य व्यवसायापासून रोजगार निर्मितीची संधी, मत्स्यसंवर्धनासाठी विविध मत्स्यजाती, नपिक, पडीक जमिनीतील मत्स्यशेती, मत्स्य प्रजनन, माशांचे पौष्टिक खाद्य, माश्यापासून तयार होणारे प्रक्रिया पदार्थ, मत्स्य जाती ओळख, मत्स्य साठवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रक्षेत्र भेटीद्वारे भातशेतीत पाणी साठविण्यासाठी बांधबंदिस्ती आणि चर, मत्स्य काढणी याबाबत डॉ वर्तक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच कृषि विदयावेत्ता डॉ. मनोज वहाने यांनी मत्स्य संवर्धनासाठी पाण्याचे भौतिक घटक व त्यांचे आवश्यक प्रमाण, पाण्याचे रासायनिक व त्याचे आवश्यक प्रमाण, सामू, सामू संतुलन, प्रकाश, पाण्याचा दाब, पाण्याची पारदर्शकता, पाण्याची घनता बाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणावेळी 50 ते 60 मत्स्य पालन शेतकर्यांनी लाभ घेतला असून या प्रशिक्षणावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यादेखील उपस्थित होत्या. पनवेल तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी भातशेतीतील मत्स्य संवर्धन करतील याबाबत आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली.