Breaking News

धनंजय मुंडे राजीनामा द्या!; सर्व स्तरांतून मागणी; भाजप आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आणि तिच्याच बहिणीसोबत मुंडे यांच्या असलेल्या संबंधांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींप्रकरणी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भाजपनेही ही मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करीत रेणू शर्मा या तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आणखी एक गौप्यस्फोट केला. रेणू शर्माची बहीण करुणा हिच्यासोबत माझे 2003पासून संबंध होते. यातून आम्हाला दोन मुले झाली, अशी धक्कादायक कबुली मुंडे यांनी दिली. या प्रकरणावरून भाजप आक्रमक झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकली आहे. त्यांनी केलेल्या प्रकारांमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा; अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध त्यांच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल याची आपण नोंद घ्यावी, असे खापरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्या यांनीही यावरून निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत असे मान्य केले आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय. त्यामुळे जोपर्यंत मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियातही मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे.

राष्ट्रवादीसह मविआ सरकार अडचणीत

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने केलेले बलात्काराचे आरोप ताजे असतानाच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तरुणीने केलेला लैंगिक अत्याचाराचा आरोप आणि अन्य महिलेसोबतचे उघड झालेले त्यांचे संबंध यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे, तर महाविकास आघाडी सरकारचीही गोची झाली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply