Breaking News

निसर्गाचे स्वच्छता अभियान!

लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली. याचा तत्काळ दिसून आलेला परिणाम म्हणून ठिकठिकाणी पक्ष्यांची किलबिल विशेष प्रयास न करताही ऐकू येऊ लागली. अनेक ठिकाणी मोर रस्त्यांवर वा निवासी वस्त्यांमध्ये अवतरले.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे जगभरातील लोकांचे डोळे सध्या लागलेले आहेत. कुठेही थोडीशी जरी आशादायक परिस्थिती दिसली तरी दिलासा वाटत आहे. एकीकडे या विषाणूचा धुमाकूळ अवघ्या जगाला चिंताक्रांत करीत आहे, मात्र त्याचवेळी जगाच्या कानाकोपर्‍यात निसर्गामध्ये दिसू लागलेले सकारात्मक बदल लोकांना विचारातही पाडत आहेत. जगभरातच हवेतील प्रदूषण घटल्याच्या बातम्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातही लॉकडाऊननंतरच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच या बदलाची ठळकपणे नोंद घेतली गेली. देशाच्या अनेक भागांत व राज्यातही घरात निवांत बसलेल्या लोकांनी आपापल्या परिसरात दिसणार्‍या पक्ष्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकायला सुरुवात केली. यातील गाजलेली छायाचित्रे होती जालंधरमधून अकस्मात दिसू लागलेल्या हिमालयाच्या धौलधर पर्वतराजीच्या शिखरांची! याच्या पाठोपाठच यमुना आणि अन्य नद्यांच्या पात्रांमधील प्रदूषण घटल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे आली. जगभरातच सध्या निव्वळ अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्याने कित्येक कारखाने बंद आहेत. स्वाभाविकपणे कारखान्यांकडून होणारे वायू आणि नद्यांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटले आहे. लॉकडाऊननंतरच्या दुसर्‍या आठवड्यातच देशाच्या किनारपट्टीनजीकच्या भागात समुद्री जीवांचा वावर ठळकपणाने वाढलेला दिसू लागला. अनेक ठिकाणी डॉल्फिनसारखे मासे किनारपट्टीच्या आणखी समीप आले. मुंबईजवळ अरबी समुद्रातही हा बदल दिसला. कोरोनाने जवळपास अवघ्या मानव जमातीला घरी बसवल्याने हे बदल दिसू लागले हे जगजाहीर होते. युरोपात तर यामुळे काही ठिकाणी फलक झळकले की ‘कोरोना इज द क्युअर, ह्युमन्स आर द डिझीज’ (कोरोना हा इलाज आहे, मानव हाच रोग). पृथ्वीवरील पर्यावरणाचा, निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला र्‍हास थांबवण्यासाठी निसर्गानेच कोरोनारूपी अस्त्र मानवाच्या दिशेने भिरकावले असावे, असा सूर लागू लागला. मानवाचा पृथ्वीतलावरील वावर कमी होताच निसर्गाची र्‍हासापासून काही अंशी तरी सुटका झाल्याचे दिसू लागले. पर्यावरणतज्ज्ञांनी जगभरातील कार्बन उत्सर्जन खाली आल्याविषयी आनंद व्यक्त केला, परंतु त्याचवेळी हे बदल तात्पुरते आहेत याची जाणीवही करून दिली. सगळ्याच देशांतील सरकारी यंत्रणांसमोर सध्या कोरोनाचा फैलाव थोपवण्याचे आव्हान आहे, मात्र या संकटावर मात केल्यानंतर मधल्या काळातील या सकारात्मक बदलांची दखल त्यांनाही निश्चितच घ्यावी लागेल. तोवर घरी बसलेल्या सर्वसामान्यांनी मात्र लॉकडाऊनच्या काळात आसपास दिसणार्‍या या सकारात्मक बदलांची अवश्य नोंद घ्यायला हवी. या बदलांना तात्पुरतेच ठरवून इतिहासजमा करायचे की ते कायमस्वरूपी टिकावेत म्हणून पुढाकार घेऊन काही पावले टाकायची, याचा विचार त्यांनी अवश्य करावा. कोरोना अवतरण्याआधीचे मानवी जिणे आणि कोरोनानंतरचे जीवन यात बरेच अंतर असणार आहे, असे गहिरा अर्थ दडलेले उद्गार बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काढले होते. आजच्या या जीवनशैलीत आपल्या दृष्टीने खरोखरंच काय महत्त्वाचे याचा विचार प्रत्येकाने अवश्य करायचा आहे. तो व्यापक स्तरावर केला गेल्यास ‘लॉकडाऊन लाइफ‘चे हे फायदे आपण निश्चितच कायमस्वरूपी टिकवू शकू.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply