कर्जत : प्रतिनिधी
भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळया संशोधन पध्दती अवलंबून अधिक उत्पादन देणार्या, कीड-रोग प्रतिकारक, समग्र पोषणमूल्ययुक्त जाती विकसित करण्यावर भर देणे गरजेचे असून, वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी येथे केले.
कोकण कृषी विद्यापिठाच्या कर्जत येथील प्रादेशीक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री सभागृहात 55 व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक भात गट चर्चेला मागदर्शन करताना डॉ. संजय भावे बोलत होते. भात व भरभराट असे समीकरण तयार होण्यासाठी भात प्रक्रिया उद्योग निर्मितीला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. भावे पुढे म्हणाले की, अधिक उत्पन्न वाढीसाठी भातानंतर भात ऐवजी भात-कडधान्य, भात-तेलबिया आधारित कृषी पध्दती अवलंबविणे आवश्यक असून समग्र पोषणमूल्यासाठीही ती गरजेची आहे.
पारंपरिक पध्दतीने भाताची नवीन जात निर्माण करण्यास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी गतिमान पैदास पध्दतीचा अवंलब करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी स्वतंत्र भात जात असावी तसेच खरीप हंगामासाठी उशिराने येणार्या गरव्या व अधिक उत्पादन देणार्या जाती निर्मितीवर भर द्यायला हवा, असे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. एम. बुरोंडकर यांनी सांगितले.
विद्यापिठाचे कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एल. नरंगळकर यांनी, कीड रोगाची तीव्रता कमीत कमी राखून अधिक उत्पादन देणार्या जाती विकसित करण्याची गरज प्रतिपादित केली. विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. जोशी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत, भात विशेषज्ज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ज्ञ डॉ. रवीन्द्र मर्दाने यांनी केले. सहाय्यक भात विशेषज्ज्ञ डॉ. पी. बी. वनवे यांनी आभार मानले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत व संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर हे ऑनलाईन तर शिरगाव (जि. रत्नागिरी) कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे, जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. व्ही. सावर्डेकर व वनशास्त्र महाविद्यालयाच्या कृषी वानिकेचे शास्त्रज्ञ डॉ. व्ही. व्ही. दळवी या वेळी उपस्थित होते.