Breaking News

बर्ड फ्लूची भीती घालविण्याकरिता आज पेणमध्ये मोफत चिकन महोत्सव

पेण ः प्रतिनिधी                                                    
बर्ड फ्लूच्या भीतीने अनेक खवय्यांनी चिकन खाणे टाळले आहे, मात्र तज्ज्ञांच्या मते व्यवस्थित शिजवलेले चिकनचे पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत नाही. नागरिकांच्या मनातील हीच भीती दूर करण्यासाठी पेण येथे शुक्रवारी (दि. 22) रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने पेण नगर परिषदेच्या मैदानावर चिकन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान होणार्‍या या महोत्सवात चिकन लॉलीपॉप, चिकन लेगपीस, चिकन बिर्याणी व अंड्यांच्या पदार्थांचा मोफत आस्वाद घेता येणार आहे.  
कोरोना प्रतिबंधक सर्व निर्बंध कटाक्षाने पाळून या चिकन महोत्सवात ब्रॉयलर कोंबडीचे पदार्थ विशेष निमंत्रिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महोत्सवात आमदार रविशेठ पाटील, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, तहसीलदार अरुणा जाधव, पोलीस, वीज वितरण, पंचायत समिती अधिकार्‍यांसह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व मान्यवरांना बॉयलर कोंबडीपासून बनविलेले विविध पदार्थ खाण्याकरिता निमंत्रित करण्यात आले आहे.
चिकन  फेस्टिव्हलमध्ये मान्यवरांनी चिकनचे विविध पदार्थ खाल्ल्याने नागरिकांच्या मनातील बर्ड फ्लूची भीती निघून जाईल व पुन्हा कोंबड्यांच्या व्यवसायाला तेजी येईल, असा विश्वास रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थांचे अध्यक्ष अनिल खामकर, उपाध्यक्ष विलास साळवी, खजिनदार मनोज दासगावकर व सचिव दीपक पाटील यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमासाठी रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या संचालकांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply