अजित आगरकरचा सवाल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम ब्रिस्बेन कसोटीत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान का नाही, असा सवाल माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने करून कुलदीपची संघात निवड करायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे. ब्रिस्बेन कसोटीसाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे कुलदीप यादव निराश झाला असेल, असेही अजित आगरकरने म्हटले आहे.
याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली होती. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यात कुलदीप यादवला फक्त एका वन डेमध्ये आणि सिडनीमधील सराव सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन यांच्यावर विश्वास दाखवला. आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी या प्रमुख खेळाडूंविना भारतीय संघ चौथ्या कसोटीत उतरला आहे. हे सर्व जण दुखापतग्रस्त आहेत. फेब्रुवारी 2019मध्ये भारताने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका 2-1ने जिंकली होती. त्यात कुलदीप यादवचे महत्त्वपूर्ण योगदान होते. परदेशातील खेळपट्ट्यांवर त्याने चांगली गोलंदाजी केली आहे.