लाखो रुपयांची खासगी रुग्णालयांची बिले, चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेणे, आजूबाजूच्या आणि नातेवाईकांची आपल्याकडे पाहण्याची बदलेली दृष्टी यामुळे कोरोना म्हटले की प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेत कामाला मुंबईला जाणार्यांचे प्रमाण मोठे असल्याने सुरुवातीच्या काळात दिवसाला 250पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत होते. आज मात्र त्याचे प्रमाण 40च्या आसपास आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात आता कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असे म्हणाला हरकत नाही. कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रित करण्यात आरोग्य विभाग आणि डॉक्टरांएवढाच महत्त्वाचा वाटा असणार्या स्वच्छतादूतांकडे मात्र अनेकांचे लक्ष गेलेले नाही. त्यांच्या कार्यालाही सलाम करणे गरजेचे आहे. एखाद्या सोसायटीत कोरोना रुग्ण आढळल्यास महापालिकेमार्फत तेथे सॅनिटायझेशन केले जाते. त्यासाठी 35 जणांची टीम आहे. ही टीम रुग्ण आढळल्यावर त्या बिल्डिंग व ब्लॉकमध्ये सोडियम हायपो क्लोराइड औषध फवारणी व एचयूए-एसएएन 25 फ्मुनिगेशन फवारणी करीत असते. कोरोना काळात या टिमने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने आज महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रित असल्याचे दिसत आहे. समाजात येणार्या कठीण प्रसंगात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखे काही लोक निरपेक्ष भावनेने तसेच तन-मन-धन अर्पण करून जनतेची सेवा करीत असतात. अशा लोकांना ना कौतुकाची अपेक्षा असते ना पुरस्काराची, पण अनेक जण आपल्याला पुरस्कार मिळण्यासाठी धडपडत असताना दिसतात. अशा ‘गरजू’ लोकांच्या शोधात अनेक पुरस्कार देणारे आपल्या संस्था घेऊन तयार असतात. प्रत्येक पुरस्काराची किंमत ठरलेली असते. काही भाग्यवंतांना (स्व:खर्चाने) पुरस्कार घेण्यासाठी दुसर्या देशात नेऊन कोणाच्या तरी हस्ते सहलीला आलेल्या लोकांच्या उपस्थितीत पुरस्कार दिला जातो. त्यांचे फोटो आपल्याकडच्या वर्तमानपत्रात छापून आणतात. त्यामुळे लोकांना वाटते केव्हढा मोठा पुरस्कार मिळाला. प्रत्यक्षात प्रायोजकांचा सहलीचा आणि पुरस्कार वाटण्याचा धंदा चालवण्यासाठी हे केले जाते. पुरस्कार दिल्याने सहलीत कोणतीही सोय नसली तरी तक्रार करता येत नाही. अशा पुरस्कारासाठी अनेक तथाकथित समाजसेवक खर्च करायला तयार असलेले पाहायला मिळते. कोरोना कमी झाल्यावर कोव्हिड योद्धा पुरस्कारांचे पेव फुटले. कोणीही उठतो आणि कोव्हिड योद्धा पुरस्कारांची खैरात वाटू लागला, असे चित्र सर्वत्र दिसू लागले. दुसर्याकडून घेऊन अथवा शासनाच्या पैशाने वस्तूंचे वाटप करणारेही कोव्हिड याद्धा झाले. त्यामुळे कोव्हिड योद्धा पुरस्कार हा रायगड जिल्हा परिषदेच्या रायगडभूषण पुरस्कारासारखा वाटू लागला. रायगड जिल्हा परिषदेने एका वर्षात 336 रायगड भूषण पुरस्कार वाटले होते. रायगड जिल्हा परिषदेने हे पुरस्कार सुरू केले त्या वर्षी फक्त पाच जणांना हे पुरस्कार दिले होते. स्व. नानासाहेब धर्माधिकारींसारख्या महनीय व्यक्तींना या पुरस्काराने गौरवल्यानंतर राजकारणासाठी या पुरस्काराचे अवमूल्यन करण्यात आले. त्या वेळी हे पुरस्कार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिले यामध्ये शंकाच नाही. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नाव सूचवायचे आणि त्यांना पुरस्कार वाटायचे हे तंत्र शेकापने सुरू केले.त्या व्यक्तीच्या कार्याची माहिती नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी पुरस्कार देऊन सत्ताधारी पक्षाने या पुरस्काराचे महत्त्वच संपवून टाकले आणि स्वत:चे मात्र हसे करून घेतले होते. तशीच काहीशी अवस्था कोविड योद्धा पुरस्कारांची झालेली पाहायला मिळते. पनवेलचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका परिक्षेत्र स्वच्छता निरीक्षक नरेंद्र आंबोलकर, कामोठे विभाग मुकादम योगेश चिमणे, खारघर विभाग मुकादम धनंजय म्हात्रे, अजय पाटील, कळंबोली विभाग मुकादम दीपक म्हात्रे, अरविंद कांबळे, रोहिंजण विभाग मुकादम अमित ठाकूर, स्वच्छतादूत विवेक म्हात्रे यांनी कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्वांमुळेच आज आपण निर्धास्तपणे फिरत आहोत, पण ते साधे सैनिक असल्याने त्यांचा गौरव संस्था-संघटनांनी केलेला दिसला नाही. ज्या वेळी कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत होता त्या वेळी कोरोना रुग्णाच्या घरात जाऊन फवारणी करायला घरातून आणि सोसायटीतूनही विरोध असायचा इथे रुग्ण आढळला समजल्यावर आजूबाजूच्यांची आमच्याकडे पाहायची दृष्टी बदलेल अशी त्यांची समजूत होती आणि ती खरीही होती. त्या वेळी त्यांची समजूत घालावी लागे. कर्मचारीही सुरुवातीला त्या ठिकाणी जाण्यास घाबरत असत. स्वच्छतादूत विवेक म्हात्रे याने खाजगी रुग्णालयात काम केले होते. त्याला शस्त्रक्रियागृह स्टरीलाईज करण्याचा अनुभव होता. त्यामुळे न घाबरता तो घरात जाऊन फवारणी करीत असे. त्यामुळे इतर कर्मचार्यांच्या मनातील भीती कमी होऊन सगळे फवारणी करू लागले. त्याचा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. त्यांच्यापैकी अनेकांना कोरोना झाला, पण बरे झाल्यावर आपण भोगलेल्या यातना दुसर्याला भोगाव्या लागू नये यासाठी ते पुन्हा आपल्या कामावर आले. म्हणून त्यांना सलाम करणे गरजेचे आहे.
–नितीन देशमुख