पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यात 50 हजाराहून अधिक पशुधन आहे. त्यांच्यासाठी तालुक्यात सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बहुतांश पदे रिक्त असल्याने येथील जनावरांना व पशुपक्षांना वेळेत उपचार मिळत नाही. शिवाय रिक्त पदांची जबाबदारी इतर अधिकारी व कर्मचार्यांवर आल्याने त्यांच्यावरील जादा कामाचा ताणही वाढत आहे.सुधागड तालुक्यात पाली, जांभुळपाडा व चव्हाणवाडी येथे श्रेणी एकचे तर वाघोशी, खवली व नांदगाव येथे श्रेणी दोनचे असे एकूण सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये 100 गावांसह वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. पालीतील पशुसंवर्धन कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना व चव्हाणवाडी येथील पशुधन विकास अधिकार्यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. पंचायत समिती व नांदगाव पशुवैद्यकीय दवाखाना येथे प्रत्येकी एक पशुधन पर्यवेक्षकपद रिक्त आहे. पाली व खवली पशुवैद्यकीय दवाखाना आणि पाली पंचायत समिती येथे प्रत्येकी एक शिपाई पद रिक्त आहे. याबरोबरच चव्हाणवाडी आणि पाली येथे ड्रेसर (व्रनोपचारक) चे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील आजारी पशुपक्षांना वेळेत उपचार मिळत नाहीत. तसेच लसीकरण व विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. अनेक वेळा उपचार न मिळाल्याने पशूंना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उपलब्ध कर्मचारी कामानिमित्त फिरतीवर असतात. त्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात पशु व जनावर घेऊन येणार्या लोकांना उपचाराविना मागे फिरावे लागत आहे. अतिरिक्त भार, कामाची विविध ठिकाणे या मुळे येथील डॉक्टर, अधिकारी व कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एका अधिकार्याकडे तीन ठिकाणचा अतिरिक्त भार
सुधागड तालुक्याला चार पशुधन विकास अधिकार्यांची तरतूद आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त जांभूळपाडा येथील एकच जागा भरलेली आहे आणि या अधिकार्याकडे पाली आणि चव्हाणवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुक्याचा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) असे तीन अतिरिक्त कार्यभार आहेत. सुधागड तालुक्यात फक्त दोन पशुधन पर्यवेक्षक असून त्यांच्याकडे प्रत्येकी एक-एक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तालुक्यात शिपाई व व्रनोपचारक यांची एकूण पदे नऊ असून त्यापैकी चार पदे भरलेली आहेत तर पाच पदे रिक्त आहेत.
उपलब्ध डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. मात्र तरीही अतिरिक्त भार असल्याने त्यांच्या कामांना मर्यादा येते. परिणामी शेतकरी, पोल्ट्री व दुग्ध व्यवसाईक, पशुपालक यांची गैरसोय होते. त्यामुळे ही रिक्तपदे शासनाने ताबडतोब भरावीत.
-राजेश मपारा, उपाध्यक्ष, भाजप दक्षिण रायगड
कामाचा अतिरिक्त भार असल्याने आम्हाला सर्वच ठिकाणी चांगली सेवा देतांना अडचणी येतात. तसेच पंचायत समिती कामे, मिटींग, योजना, अलिबाग मिटींग आदि सगळे पहावे लागते. तरीही आम्ही आमचे काम चोखपणे बजावतो.
-डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, पाली-सुधागड