Breaking News

महसूल संघटनेकडून सोनखार गावातील 536 पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचे वाटप

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, मुंबई उपनगर महसूल कर्मचारी संघटना व सेवा संकल्प ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील सोनखार गावातील महापुराने बाधित झालेल्या 536 कुटुंबांना जीवनावश्यक 11 वस्तूंचे 536 किट वाटप, तसेच 120 प्राथमिक व 54 माध्यमिक शाळेच्या विद्यार्थांना वह्यांचे व दप्तरांचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. पूरग्रस्त भागातील किमान 1800 व्यक्तींची 10 डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महसूल संघटनेने मदत केली आहे.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील पेण, महाड, नागोठणे, रोहा या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पेण तालुक्यातील कणे, अंतोरे, सोनखार, वाशी, वढाव या भागात पाणी घुसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे हजारो हात पुढे आले, पण रायगडसह कोकणातील पूरभागात मदत पोचली नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव घेऊन जिल्हा प्रशासनातील महसूल संघटना पुढे आली. या संघटनेकडून पेण तालुक्यातील सोनखार गावातील 536 कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली.

राज्य महसूल संघटनेचे सहसचिव विप्रदास परूळेकर व मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अभय सावे रावसाहेब यांनी अशा पूरग्रस्त दुर्लक्षित गावांना आपण संघटनेच्या वतीने मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार सेवा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने, मुंबई उपनगर जिल्हा महसूल संघटना, मुंबई उपनगर महसूल पतसंस्था यांनी सुमारे दोन लाखांचा निधी उपलब्ध करून दिला, तसेच सेवा संकल्प प्रतिष्ठान यांनी एक लाख 15 हजारांची मदत केली. काही दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या मदतीने या गावांतील ग्रामस्थांना विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा संकल्प केला. महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांनीही या कार्यास हातभार लावला. पेण तालुक्यातील सोनखार येथे जाऊन तेथील बाधित कुटुंबांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्यासह महसूल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply