नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर या वेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला. दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला गेल्याचे बोलले जात असले तरी पक्षातील कार्यकर्त्यांची अंतर्गत खदखद आगामी निवडणुकीवर परिणामकारक ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी होणार्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत तर नवी मुंबईतील महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचे प्रभाग वाटपदेखील झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक एक वर्षे पुढे ढकलली गेली असून या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख आणि मनसे, आप, एमआयएम, वंचित आघाडी या पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. एकेकाळी ठाणे, नवी मुंबईत एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाची नवी मुंबईत अत्यंत दुरवस्था आहे. स्वबळावर निवडून येणारे काही नगरसेवक या पक्षात आतापर्यंत टिकून आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत 111 पैकी केवळ 10 नगरसेवक निवडून आलेल्या या पक्षाला राष्ट्रवादीने सामावून घेतल्याने उपमहापौरपद पदरात पडू शकले होते. या पक्षाला यंदाच्या निवडणुकीत 20 ते 22 प्रभागांची मागणी आहे. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचे प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत, मात्र शिवसेनेचे बालेकिल्ले असलेले प्रभाग सोडण्यास तयार नसल्याने या पक्षाची पंचाईत झाली आहे. नेरूळ पश्चिम भागात शिवसेनेचे प्राबल्य असून हे प्रभाग काँग्रेसला हवे आहेत. या विभागातील काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी यांची पूर्व भागातील दोन प्रभागांत गेली अनेक वर्षे सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे प्रभाग वाटपात सोडले जाणार असून इतर प्रभागांचा साधा विचारदेखील करण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या एका बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ठरवून अध्यक्ष अनिल कौशिक व प्रभारी तारीक फारुक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेली अनेक वर्षे काम करणार्या कार्यकर्त्यांना किमान पालिका निवडणुकीत न्याय मिळणार नसेल तर पक्षाने सर्व प्रभागांत उमेदवार उभे करावेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थानिक पातळीवरच सुरुंग लागत असून कार्यकर्त्यांत खदखद सुरू झाली आहे. हीच भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही आहे.
शिवसेनेतील अंतर्गत वादाची धग कायम
आघाडीबाबत काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झालेली असतानाच मध्यवर्ती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यावरून दोन आठवड्यांपूर्वी उपनेते विजय नाहटा आणि शहरप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यातील वादावर पडदा टाकण्यात पालकमंत्री शिंदे यशस्वी झाले आहेत. यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. हा वाद वरकरणी थंड झाला असला तरी त्याची धग कायम असल्याचे बोलले जात आहे.