पेणमधील कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह
अलिबाग : प्रतिनिधी
बर्ड फ्लूने रायगड जिल्ह्यात शिरकाव केला आहे. पेण येथील सरकारी कुक्कुटपालन कृत्रिम रेतन केंद्रातीलच कोंबड्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे खवय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बर्ड फ्लूचे सावट पोपटीवरदेखील पसरले आहे.
रब्बी हंगाम सुरू झाला की रायगडकरांना पोपटीचे वेध लागतात. वालाच्या किंवा इतर ताज्या शेंगा आणि मसाला लावलेले चिकन मडक्यात गच्च भरून त्याला जाळ देऊन ते वाफेवर शिजवले जाते. ही गरमागरम पोपटी खायला फार चविष्ट असते. त्यामुळे ठिकठिकाणी पोपटी पाटर्यांचे आयोजन केले जाते, परंतु आता बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे या पोपटीदेखील बंद झाल्या आहेत.
रायगड जिल्हा मुंबईला लागून असल्याने इथल्या पोल्ट्री व्यवसायाला मोठी बाजारपेठ आहे. कोंबड्यांच्या वाहतुकीवर होणारा खर्च कमी असल्याने तो अधिक फोफावला असून पुणे, नाशिकनंतर या व्यवसायात रायगड जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे या व्यवसायातून जिल्ह्यात मोठा रोजगार उपलब्ध होत आहे.
पेणपाठोपाठ अलिबाग तालुक्यातील चौल परिसरातही मंगळवारी 17 कोंबड्या मरण पावल्याची बाब समोर आली असून, त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीतीमुळे चिकन खरेदी केले जात नाही. परिणामी पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
आमच्याकडील कोंबड्यांचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आम्ही तातडीने सर्व कोंबड्यांचे कलिंग केले. परिसरातील कोंबड्याही नष्ट करण्यात आल्या. पेण परिसरातील सर्व चिकन सेंटर्स बंद ठेवण्यात आली आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव अन्यत्र होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी, मात्र घाबरून जाऊ नये.
-डॉ. सुभाष म्हस्के, पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड