Breaking News

राज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, या संदर्भात बुधवारी (दि. 20) होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. सर्व प्रकारच्या आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे, अशी कृती राज्य सरकारची दिसत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्तानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी फडणवीस म्हणाले, राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात घोळ घालतंय त्यावरून सरकारच्या मनात काय आहे तेच कळत नाही. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. मराठा आरक्षण संदर्भातली जी स्थिती आहे, ती केवळ राज्य सरकारच्या घोळामुळे आहे. सरकार ठामपणे एक भूमिका मांडत नाही. प्रत्येक वेळेस एक नवीन भूमिका मांडत आहे. सरकारच्या दोन मांडण्यांमध्ये प्रचंड फरक आहे. सरकारची कमिटी कुणाशी बोलते, काय निर्णय होतो काहीच कळत नाही.
भाजपचे समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचे समाधान करा. तुमच्या नाकर्तेपणामुळे ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांचे समाधान करा. आमच्या समाधानाचा विषय तुम्ही सोडून द्या. आम्हाला तर कधी तुम्ही चर्चेलाही बोलाविले नाही. आमची तुमच्या विषयी काही तक्रार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, पण मराठा समाजाला न्याय द्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply