Breaking News

इकडे आग, तिकडे विहीर

लसीकरणाच्या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळत असल्याकारणाने सरकारी यंत्रणेमध्ये आधीच चिंतेचे वातावरण होते. त्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आग लागल्याच्या बातमीने भरच पडली. देशव्यापी लसीकरण ही सोपी बाब नाही. किंबहुना, ते एक मोठे आव्हानच आहे याची कल्पना सार्‍यांनाच एव्हाना आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आघाडीच्या फळीतील कोरोना योद्ध्यांना अग्रक्रमाने लस टोचण्याचे काम देशभर सुरू आहे. एव्हाना सुमारे आठ लाख कोरोना योद्ध्यांना लस टोचून झाली आहे. महाराष्ट्रात मात्र या मोहिमेला फारशी गती मिळालेली नाही असे दिसते. कोरोना विषाणूच्या विरोधात अवघ्या देशाने दंड थोपटले असून हजारो जीव घेणार्‍या या महाभयानक विषाणूविरुद्धची देशव्यापी लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. येत्या काही महिन्यांत कोरोनाचा फास पूर्णपणे सुटलेला दिसेल, अशी आता खात्री वाटू लागली आहे. कारण या विषाणूचा खात्मा करणारी लस प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतातच बनू लागली आहे. भारतात, तेदेखील पुण्यात कोरोनाचा नायनाट करणारे अमोघ अस्त्र बनते आहे ही महाराष्ट्रासाठीदेखील अभिमानाचीच बाब म्हटली पाहिजे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या नावाजलेल्या औषध कंपनीमध्ये अनेक लसी यापूर्वीही बनत होत्या. याच कंपनीच्या मांजरी येथील बांधकाम स्थितीत असलेल्या इमारतीत गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. त्यात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. कोरोनाशी मुकाबला करणार्‍या कंपनीला सुरुवातीलाच अशा दुर्दैवी अपघाताला तोंड द्यावे लागणे विचित्रच वाटते. अपघातग्रस्त इमारतीत कोविशिल्ड ही लस तयार होत नव्हती किंवा तिचा साठाही तेथे करण्यात आला नव्हता. तरीही आगीची बातमी कळताच अनेकांच्या मनात शंकाकुशंकांचे पेव फुटणे साहजिकच होते. विद्युत जोडण्यांच्या कामात वेल्डिंग करताना हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तपासाअंती खरे कारण कळेलच. या अपघातामुळे सरकारी यंत्रणा मात्र खडबडून जाग्या झाल्या. कोरोनासंबंधी लसीकरणाचे नियमन ज्याद्वारे होते त्या कोविन अ‍ॅपमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे महाराष्ट्रात पहिल्या दोन-तीन दिवसांत गोंधळाचीच परिस्थिती होती. त्यात भरीस भर म्हणून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींबाबत अनेक समज-गैरसमजांचे पेव फुटले. अनेक कोरोना योद्ध्यांनी लस घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ सुरू केली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या शनिवारी राज्यात उद्दिष्टाच्या 64 टक्के लसीकरण झाले. मात्र मंगळवारी हे प्रमाण अवघ्या 50 टक्क्यांवर आले. बुधवारी त्यात पुन्हा काहिशी वाढ पहायला मिळाली. मुंबईत मात्र तिन्ही दिवस हे प्रमाण 50 टक्क्यांच्या आसपासच घुटमळताना दिसले. इतर राज्यांमध्ये कोव्हॅक्सिन लशीच्या चाचणीच्या टप्प्यात आढळलेल्या दुष्परिणामांमुळे आरोग्य कर्मचार्‍यांच्या मनात तिच्या सुरक्षिततेविषयी तसेच परिणामकारकतेविषयी साशंकता आहे. त्यातूनच लसीकरणाला मिळत असलेला थंड प्रतिसाद आणि इतर अनंत अडचणी यांच्या सावळ्या गोंधळातच गुरुवारी सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्याचे वृत्त आले. अशा प्रकारांमुळे खचून न जाता सरकारी आरोग्य यंत्रणेने डोके थंड ठेवून आपल्या लक्ष्याकडे वाटचाल केली पाहिजे. कोरोनाचे फावेल अशी कुठलीही कृती सरकारी व्यवस्थेनेही करू नये आणि आपल्यासारख्या नागरिकांनीदेखील जबाबदारी ओळखून लस टोचून घेण्यामध्ये टाळाटाळ करू नये. त्यातच आपल्या देशाचे आणि समाजाचे हित आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply