Breaking News

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अग्नितांडव

पाच जणांचा होरपळून मृत्यू

पुणे ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लशीची निर्मिती करणार्‍या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला गुरुवारी (दि. 21) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी ही आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकार्‍यांशी बोललो आहे. बिल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. कोरोना लसनिर्मिती जिथे होते, ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळे कोरोना लशीचे कोणतेही नुकसान झाले नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  
दरम्यान, पुण्यातील मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला ही आग लागली, मात्र सुदैवाने ज्या इमारतीमध्ये कोव्हिशिल्ड लसनिर्मितीचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी ही आग लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या इमारतीमध्ये आग आगली, त्यामध्ये बीसीजी विभाग आहे. या इमारतीत बीसीजीची लस तयार करण्याचे काम चालते. कोरोना लशीचे संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशिल्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने मागविला अहवाल
कोरोना लस तयार होत असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये भीषण आग लागली आहे. आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोरोना आणि इतर लशींची निर्मिती या ठिकाणी होत असल्याने या आगीची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. केंद्रीय यंत्रणा याबाबत सतर्क असून केंद्रीय तपास यंत्रणेने या आगीचा अहवाल मागविला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply