महाड शहरात पाणी तुंबण्याचा धोका; रोगराई वाढण्याची शक्यता
महाड : प्रतिनिधी
महाड शहरातली मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी जर नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाही, तर शहरात पावसाचे पाणी तुंबून रोगराईचा धोका वाढणार आहे. पावसाळ्यापुर्वी शहरांतील नाले, गटारे व अन्य सफाईची कामे स्थानिक प्रशासन म्हणून नगरपालिकेकडून करण्यात येतात. महाड शहरातही दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी ठेकेदाराकडून नाले आणि गटारांची सफाई केली जाते. मात्र या वर्षी आचारसंहिता असल्याने निविदा काढलेली नसल्याचे नगरपालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी सांगितले.
महाड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्याचबरोबर कचरा समस्याही मोठी होत आहे. स्वच्छता अभियानामुळे ही कचरा समस्या कांही अंशी दूर झाली असली तरी शहरातील गटारे व नाले कचर्याने भरले आहेत. शहरांत नियमित स्वच्छता होत असल्याचा दावा महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र नाले, गटारे यांची सफाई वर्षातून केवळ पावसाळा सुरु होण्यापुर्वी केली जात असल्याचे दिसून येते. यावर्षी तर अर्धा मे महिना सरला तरी अद्याप नालेसफाई सुरु झालेली नाही.
महाड शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी असलेला प्रमुख नाला सुमारे 2.5 किमी लांबीचा आहे. तो वर्षातून दोन ते तीनवेळा साफ करणे आवश्यक आहे. सुके नाले तसेच पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा तीन भागात नालेसफाई केली जाते. मात्र यावर्षी अद्याप नालेसफाईच्या कामाचे आदेश देण्यात आले नाहीत.
शहरांतील कुंभारआळी, सरेकरआळी, कोटेश्वरीतळे, काकरतळे, जवाहर नगर सोसायटी, प्रभात कॉलनी, रोहिदास नगर, नवेनगर, सुतारआळी, पानसरे मोहल्ला, खारकांड मोहल्ला, देशमुख मोहल्ला, सुलतान गल्ली, काजळपुरा, कोटआळी, मच्छी मार्केट, भोईघाट, तांबट आळी, चवदारतळे, दस्तुरीनाका, गोमुखीआळी, भीमनगर या प्रमुख वसाहतीमधील गटारे साफ करण्यात येत नसल्याची तक्रार तेथील नागरिक करत आहेत.
लायन्स क्लब ते बाजारपेठेतील डोंगरी पूल या दरम्यान 446 मीटर लांबीच्या नाल्याची सफाई वर्षातून एकवेळ करण्यात येते. मात्र यावर्षी आचारसंहिता लागू असल्याने अद्याप निविदा काढण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील नालेसफाई रखडली आहे. परिणामी येत्या पावसाळ्यांमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.